Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

कौतिकरावांचा विश्व तमाशा
अभय अरविंद
Monday, March 08, 2010 AT 01:48 AM (IST)
Tags: Lolak

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी, आपल्या वादावादी-भांडणाच्या "तमाशा'चा फड दुबईतही गाजवलाच! जेथे कौतिकराव तेथे मानापमानाच खेळ रंगणारच आणि त्यांच्या मग्रुरीचा फटका संयोजकांना बसणारच, याची खात्री मराठी साहित्य रसिकांना आहेच. दुबईतल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नेमके तसेच घडले. कौतिकरावांची उपस्थिती असताना कोणतेच भांडण कसे झाले नाही? अशी शंका मराठी साहित्य रसिकांना, संमेलनाचे उद्‌घाटन सुरळीतपणे झाल्यावर आली होती. पण, कौतिकरावांनी घालायचा तो घोळ घातलाच. दुबईतल्या महाराष्ट्र मंडळ आणि प्रायोजक धनंजय दातार यांना बाजूला ठेवून त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत आपल्या मर्जीनुसार परस्परच फेरबदल घडवले. नाट्य परंपरेनुसार नांदी सर्वप्रथम असते. त्यासाठी संयोजकांनी महाराष्ट्रातून रंजना फडके यांना आवर्जून निमंत्रित केले होते. त्या नांदी सादर करायच्या तयारीत असतानाच, ठाल्यांनी हुकूम सोडला, नांदी रद्द..! रद्द म्हणजे रद्द..! मी सांगतो, तसेच झाले पाहिजे. मी महामंडळाचा अध्यक्ष आहे. त्यांच्या या मर्कट लीलांमुळे प्रायोजक दातार वैतागून गेले. रंजना फडके यांच्या झालेल्या अपमानाने संतापले. पण, ठाल्यांचा ठेका कायम होता. नांदी नाही..! संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वात शेवटी रंजना फडके यांना नांदी गायला त्यांनी परवानगी दिली. कार्यक्रमाची सांगता भैरवीने होते, याच्याशी त्यांचे काही देणे-घेणे नव्हते. भैरवी काय आणि नांदी काय? ठाल्यांना मिरवायला आणि हुकूमशाही गाजवायला मिळाले म्हणजे झाले! नृत्यांगना फडके यांचा अपमान करून ठाले आपल्याच मस्तीत माजुरडेपणाने फिरत होते. आपल्या हुकूमशाहीने विश्व संमेलनाचे वांगे झाले, याच्याशी त्यांचे काही देणे-घेणे नव्हते.
ठाल्यांच्या या आचरटपणामुळे संतापलेल्या दातार यांनी त्याच दिवशी त्यांच्यावर टिकेची तोफ डागली. आपण या संमेलनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आणि ठाल्यांनी मात्र मूळ कार्यक्रमपत्रिका आपल्या मर्जीनुसार बदलून एकाधिकारशाही गाजवली, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अर्थातच या असल्या टिकेला भीक घालतील तर ते ठाले- पाटील कसले? सांगलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला नाही, तर त्यांनी आणलेला तो तांब्या होता, अशी मुक्ताफळे याच ठाले-पाटील यांनी उधळून त्या संमेलनाचाही विचका केला होता. महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनातही त्यांनी एकाधिकारशाहीचा कळस केला. त्या साहित्य संमेलनाचा बोऱ्या वाजवला. आता दुबईचे विश्व साहित्य संमेलन सुरळीतपणे पार पडणार हे लक्षात येताच त्यांना पोटशूळ उठला असावा. त्यामुळे त्यांनी संयोजक, प्रायोजक आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळाला मोडीत काढून, आपल्या हुकूमशाही कारभाराचा हिसका असा दाखवला असावा.
दुबईतील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा सौ. संजीवनी पाटील यांनी रंजना फडके यांची भेट घेऊन माफी मागितली. सोबत वगसम्राट ठाले-पाटील होतेच. पण, ते एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फडके यांची माफीही मागितली नाही. फडके यांनी झाले गेले विसरून संयोजकांच्या विनंतीनुसार संमेलनाच्या समारोपाच्या आधी नांदी सादर केली. झाल्या अपमानाने त्या खवळल्या होत्याच. पण, त्यांनी दिलदारपणे झाल्या प्रकरणावर मनमोकळेपणाने पडदा टाकला. पण, ठाले-पाटलांना मात्र माफीचे प्रकरण आवडलेले नसावे. त्यामुळेच त्यांनी प्रसिद्धी माध्यमांवर आगपाखड केली. मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही, तुम्हाला काय छापायचे ते छापा, असे उर्मटपणे बोलून ठाले-पाटलांनी थयथयाट केला. संमेलनाचे सूपही त्यांनी असे वादानेच वाजवले.
मूळ कार्यक्रमपत्रिकेत ठाले-पाटील यांनीच परस्पर बदल घडवला. त्यामुळेच हा वाद निर्माण झाला. वास्तविक ठाले-पाटलांनी फडके यांची लगेचच माफी मागितली असती तर, पुढचे रामायण घडले नसते. असे वाद झाल्यास विश्व साहित्य संमेलनाला प्रायोजक मिळणार नाहीत, असे दातार यांनी रोखठोकपणे सांगून टाकले. या संमेलनाचे खलनायक ठाले-पाटील यांना मात्र, आपल्यामुळे संमेलनात वादावादी झाली याची काही शरम वाटत नाही. या माणसाकडे लाजच नाही. आता ते पुण्याचे  संमेलन कसे गाजवायचे आणि वाजवायचे याची कट-कारस्थाने करीत असतील.
- वासुदेव कुलकर्णी
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: