Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

स्वार्थत्याग
वार्ताहर
Monday, March 08, 2010 AT 01:08 AM (IST)
Tags: Vachnamrut
काही हिंदुस्थानी तरुण एका जपानी जहाजामध्ये बसून चालले होते. त्यांच्या वर्गातील उतारुंना जे जेवण मिळत असे, ते काही कारणांमुळे त्यांनी घेतले नाही. एका गरीब जपानी तरुणाने पाहिले, की हे सर्व हिंदी तरुण भुकेलेले आहेत, म्हणून त्याने त्या सर्वांसाठी दूध, फळे वगैरे विकत आणून त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी प्रथम नेहमीच्या चालीप्रमाणे त्याचा स्वीकार केला नाही, पण नंतर त्यांनी ती घेऊन खाऊन टाकली. जहाजावरून उतरण्याच्या वेळी, त्या जपाने मुलाचे आभार मानून ते त्या वस्तूंची किंमत देऊ लागले. त्याने ती घेतली नाही. उलट हात जोडून तो प्रार्थना करू लागला, की जेव्हा "जेव्हा आपण हिंदुस्थानात जाल, तेव्हा कोणाला असे सांगू नका, की जपानी लोक इतके नालायक आहेत, की त्यांच्या जहाजावर खालच्या दर्जाच्या उतारुंची खाण्यापिण्याची मनाजोगी सोय नसते.'
जरा विचार करा, की एक गरीब तरुण प्रवासी, त्या जहाजाशी स्वत:चा काही संबंध नसूनही आपला पैसा खर्च करतो आहे, कशाकरीता? तर कोणी आपल्या देशाच्या जहाजाला नावे ठेवू नयेत. हा तरुण स्वदेशाहून स्वत:ला निराळे अस्तित्व आहे, असे मानत नव्हता. सगळ्या देशाचे जीवन तेच आपले जीवन, अशी त्याची पूर्ण भावना झाली होती. केवढे हे प्रेम! केवढा हा स्वार्थत्याग! याचे नाव शुध्द ऐक्य, रोख धर्म! या व्यावहारिक वेदांतावाचून ऐश्वर्य आणि कल्याण प्राप्त होणे असंभवनीय आहे.
"जो स्वत:करिता जगतो त्याने मरणे हेच बरे! मानवजातीकरिता जो मरतो तोच खरा जिवंत होय!'
आपल्या लक्षात असेल, की रशियन लोकांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची जेव्हा जपानला जरुरी पडली आणि त्याकरिता काही बोटी समुद्रामध्ये बुडवायच्या होत्या तेव्हा मिकाडो बादशहा म्हणाला,  माझ्या प्रजेपैकी कोणालाही या कामी मी सक्ती करीत नाही, परंतु ज्यांची या जहाजाबरोबर बुडण्याची खुशी असेल, त्यांनी स्वयंसेवक म्हणून अर्ज करावा.' तेव्हा जरुर होते त्यापेक्षा हजारो अर्ज अधिक आले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: