तेजस्विनींच्या प्रकाशवाटा
वासुदेव कुलकर्णी
Monday, March 08, 2010 AT 01:45 AM (IST)
"कुठल्याही कामाची सुरुवात अगदी छोटी असते. सुरुवात छोटी पण त्याची उर्मी मोठी असते आणि उत्तुंग कामं उभी राहतात. प्रचंड भरदार वृक्ष एका छोट्या कोंबापासून मोठा होता. गगनचुंबी इमारतीची सुरुवात मातीच्या छोट्या ढिगापासून होते आणि हजारो मैलांचा प्रवास एका छोट्या पावलापासून सुरु होतो.'
चिनी तत्वज्ञ-ताओ.
ताओचं हे सुभाषित महाराष्ट्रातल्या महिला बचतगटाच्या तेजस्विनींनी शोधलेल्या प्रकाशवाटांनी सार्थ ठरले आहे. आज जागतिक महिलादिन साऱ्या देशभर उत्साहाने साजरा होईल. महिलांना समान सामाजिक हक्क आणि न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी महिला संघटना हिरीरीने करतील. संकटावर मात करून यशस्वी झालेल्या माता आणि गुणी कर्तृत्ववान महिलांचा गौरव होईल. हायफाय संस्कृतीत मुरलेल्या स्त्री मुक्तीवादी संघटनांच्या नेत्या, स्त्रियांना "स्पेस' मिळाला पाहिजे, असे अट्टाहासाने सांगतील. रुढी-परंपरा आणि अंधश्रध्दांच्या विळख्यात अडकलेल्या भारतीय समाजातल्या स्त्रियांची मुक्तता व्हायला हवी, असेही आग्रहपूर्वक प्रतिपादन केले जाईल. मंत्री यशस्वी महिलांचे गुणगाण गातील. पण, ज्या लाखो महिलांना स्त्री मुक्ती आणि महिलादिन म्हणजे काही माहिती नसलेल्या गरीब कुटुंबातल्या लाखो महिला याच दिवशी आपल्या कुटुंबासाठी नेहमीप्रमाणेच श्रम करीत असतील. शेतकरी महिला या कडाक्याच्या उन्हात काळ्या आईची सेवा करीत असतील. आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना सुखाचे दिवस यावेत, यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या लाखो महिलांच्या श्रमाची पूजा करायचा हा खरा दिवस आहे. जिद्द, निर्धार आणि परिश्रमाच्या बळावर आपल्या जन्मजात नियोजनाच्या विश्वासावर ज्या लाखो महिलांनी श्रमाद्वारे आर्थिक स्वावलंबन मिळवले, त्या आत्मनिर्भर झालेल्या तेजस्विनींनी शोधलेल्या प्रकाशवाटांचा मागोवा या आंतरराष्ट्रीय महिलादिनी घ्यायलाच हवा. सात वर्षांपूर्वी तेव्हाचे ग्रामीण विकासमंत्री आर. आर. पाटील यांनी दूरदृष्टीने ग्रामस्वच्छता अभियानाचा राज्यात प्रारंभ केला आणि त्याचवेळी महिला बचतगटाद्वारे घराघरात येणाऱ्या आर्थिक समृध्दीचे महत्व ओळखून, या अभिनव चळवळीलाही प्रोत्साहन दिले. सर्व ग्रामीण आणि दुर्गम खेड्या-पाड्यातल्या ग्रामीण महिलांनी या नव्या संधीचा अचूक फायदा घेत, स्त्री शक्तीचा संघटित अविष्कार राज्याला आणि देशालाही दाखवला आहे. ग्रामीण भागातल्या गरीब, श्रमिक महिलांना नव्या छोट्या व्यवसायासाठी चार-पाचशे रुपये कर्ज मिळवताना प्रसंगी अवमान सहन करावा लागत असे. या कर्जावर प्रचंड व्याजही द्यावे लागे. बहुतांश वेळा संसारिक अडचणीसाठी शंभर-दोनशे रुपये उसनवारही मिळत नसत. पण आता ही स्थिती राहिलेली नाही. महिलांनी स्थापन केलेल्या बचतगटांच्या प्रगतीमुळे राज्यातल्या सहा लाख बचतगटातल्या साठ लाखाच्यावर महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर झाल्याच, पण स्वत:च्याच श्रमातून मिळवलेल्या मजुरीतून त्यांनी कोट्यवधी रुपयांची बचतही केली. या बचतीद्वारे आणि सरकारी योजनेनुसार राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून मिळालेल्या चार टक्के व्याजाच्या सवलतीतून, केंद्र-राज्य सरकारच्या अनुदानातून स्वत:चे रोजगारही सुरु केले. आधुनिक व्यवस्थापनाचे कसलेही तंत्र माहिती नसताना या अल्पशिक्षित-शिक्षित महिलांनी बचतगटांच्या मिळालेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. स्वत:चा संसार सांभाळून या माऊलींनी सामूहिक शेतीपासून ते दुग्धव्यवसाय, पापड, लोणची, मसाल्याचे पदार्थ यांसह शेकडो उद्योग यशस्वीपणे चालवले आहेत. काही महिला बचतगटांच्या उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठही बघता बघता काबीज केली. उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे आणि हिशोब, कर्जाची परतफेड करण्यापर्यंतचे व्यावसायिक कौशल्यही या महिलांनी अनुभवाद्वारे आत्मसात करुन दाखवले, हा स्त्री शक्तीचा प्रकट अविष्कार प्रशंसनीय आणि आदर्शच होय!
बचतगटांची यशस्वी चळवळ
गेल्या काही वर्षात सहकारी क्षेत्रातल्या काही बॅंका आणि पतसंस्था गैरकारभार, भ्रष्टाचाराने दिवाळ्यात निघाल्या. पण त्याच काळात महाराष्ट्रातल्या हजारो बचतगटांनी मात्र छोटे-मोठे उद्योग यशस्वी करून, आर्थिक क्षेत्रात नवे युग निर्माण केले आहे. ज्या बांगला देशात बचतगटांची चळवळ जगात सर्वप्रथम सुरु झाली, तेथे प्रा. मोहंमद युनुस यांना ग्रामीण भागातल्या स्त्री शक्तीचा आणि त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा साक्षात्कार झाला. जामिनावर बॅंकांनी दिलेली कर्जे साठ टक्के थकित होत असताना, त्यांनी चितगावजवळच्या जोब्रा गावात सुरु केलेल्या बचतगटाची कर्जवसुली मात्र शंभर टक्के झाली. याच प्रयोगाचा त्यांनी विस्तार केला. 1983 मध्ये बांगला देशातल्या ग्रामीण बॅंकांची स्थापना केली. आता त्या देशात चाळीस हजार खेड्यातल्या चोवीस लाख महिला या बॅंकेच्या सदस्य आणि लाभधारक आहेत. या बॅंकेची वसुली 95 टक्के आहे. बचतगटाचा हाच प्रयोग भारतात आणि राज्यात सुरु झाल्यावर तो कितपत यशस्वी होईल, याबद्दल काही अर्थतज्ञांनी घेतलेले आक्षेप, बचतगटांनी निराधार ठरवले. मुंबईत 1973 मध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या संपानंतर कामगारांवर ओढवलेल्या बेकारीवर मात करायसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने दादा पुरब यांची मागणी मान्य करून तेव्हा, कामगारांच्या पत्नींना प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जातून त्या महिलांनी स्वयंरोजगार उभे केले. दोन कोटीचे हे कर्ज फेडलेही. बचतगटाच्या चळवळीचे ते मूळ होते. महाराष्ट्रातल्या बचतगटांच्या या चळवळीत सातारा जिल्हाही, अग्रणी "बॅंक ऑफ महाराष्ट्र' च्या प्रोत्साहनाने आघाडीवर आहे. राष्ट्रीय कृषी विकास ग्रामीण बॅंक (नाबार्ड), सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, स्टेट बॅंक आणि अग्रणी बॅंक ऑफ महाराष्ट्रसह या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी झालेल्या बॅंकांनी या जिल्ह्यातल्या सोळाशे पंचवीस गावात 32 हजार महिला बचतगटांना अर्थसहाय्य दिले. जिल्हा बॅंकेने अवघ्या चार टक्के व्याजाने अर्थपुरवठा केला. स्वर्णजयंती महिला स्वयंरोजगार योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालच्या महिलांना बचतगटांना आर्थिक सहाय्य मिळाले. ग्रामीण भागापर्यंत ही चळवळ रुजली आणि वाढली. बचतगटांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेडही केली. महिलांच्या एकजुटीने नव-नवे उद्योग सुरु झाले. जिल्ह्यातल्या महिलांचे बचत भांडवल पंधरा कोटी रुपयांच्यावर गेले. तर कर्जवाटप 45 कोटीच्यावर गेले. गटात सहभागी असलेल्या महिलांचे सरासरी उत्पन्न दरमहा पाचशे ते पंधराशे रुपये झाले. या महिलांनी अत्यंत चिकाटीने सुरु केलेले उद्योग आणि व्यवसाय यशस्वी केले. समूह कर्जांची विश्वासार्हता वाढली. महिला या अत्यंत जाणिवपूर्वक प्रत्येक पैशाचा विनियोग करतात, त्या चोख हिशोबही ठेवतात, हे त्यांनी सिध्द करून दाखवले. शेतीपासून ते दुग्ध सोसायटीपर्यंतचे शेकडो उद्योग या जिल्ह्यातल्या महिलांनी यशस्वी केले आहेत. राज्यातल्या महिला बचतगटांनी स्वावलंबी व्हायसाठी आर्थिक क्षेत्रात घेतलेली ही भरारी लक्षात घेता, राज्य सरकारने ग्रामीण भागात या महिलांना सूक्ष्म अर्थपुरवठा करणारी स्वतंत्र ग्रामीण बॅंक सुरु करायला हवी. ही बॅंकही श्रमिक महिला नक्कीच यशस्वी करून दाखवतील. महिला बचतगटांच्या आर्थिक निर्भरतेला नवी दिशा आणि भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल. या लाखो श्रमिक महिलांच्या जिद्दीला वंदन!