प्रेमभंगावरचं औषध
वासुदेव कुलकर्णी
Tuesday, March 09, 2010 AT 12:51 AM (IST)
प्रेम, प्रेम, प्रेम असतं
तुमचं आमचं सेम असतं।
असं कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं म्हणणं असलं तरी, प्रत्यक्षात मात्र प्रेमात पडलेल्या युवक-युवतींना जगाचंही भान नसतं. गरीब, श्रीमंत, जातीभेद, धर्म, प्रांत-देश ही सारी बंधनं प्रेमिक झुगारून लावतात. प्रेमापुढं सारं जग त्यांना शून्य वाटतं. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्यात आपल्या आई-वडिलांचा विरोधही धुडकावून लावायचं धाडस असतं. प्रियकर गरीब असला तरीही, श्रीमंत घरातली प्रेयसी आपल्या प्रेमाच्या पूर्तीसाठी श्रीमंती सोडून देते. प्रियकराशी विवाह करून जिद्दीनं संसार मांडते. ज्यांचं प्रेम सफल होतं, ती प्रेमी जोडपी भाग्यवान! पण काही प्रेमिकांचं प्रेम सफल होत नाही. दोघांनाही प्रेमभंगाचे दु:ख सोसावे लागते. प्यार में जलने वालों को चैन कहॉं, आराम कहॉं। असं व्याकुळ जीवन त्यांच्या नशिबी येतं. कधी मुलीचा बाप तर कधी मुलाचा बाप या प्रेमी जोडप्यांची ताटातूट करतो. भारतात तर खानदानाची अब्रू, घराणं, जात, हे असले अनेक अडथळे प्रेम सफल होण्याच्या मार्गात येतात. हरियाणा राज्यात तर जाती पंचायतीचा प्रचंड प्रभाव समाजावर असल्यामुळं, विवाह झालेल्या प्रेमी जोडप्यांचीही ताटातूट सक्तीनं केली जाते.
प्रेमात पडलेल्यांनाच खरं प्रेम म्हणजे काय? ते उमगतं.
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.
असं प्रेमिक सांगतात. प्रेमभंगाचं दु:ख असह्य झाल्यानं काही युगुलं आत्महत्याही करतात. परस्परांशिवाय आपण जगूच शकणार नाही, असं त्यांना वाटतं. अशा शेवटच्या टोकाला गेलेली प्रेमी युगुलं आपलं जीवनच संपवतात. पण, खरं प्रेम आत्महत्येच्या मार्गाला विरोध करतं. प्रेयसी आपली होत नाही, हे दारुण दु:ख धैर्यानं पचवणारा प्रियकर, "तू कुठेही रहा, पण सुखी रहा', अशी सदिच्छा प्रेमभंग झाल्यावरही देतो. प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी, हे प्रेमभंग झालेल्या युगुलांना पटत नाही. त्यामुळंच काही प्रेमभंग झालेली युगुलं आपलं जीवनध्येय सोडून एकाकीपणे जीवन जगतात. तर काही आयुष्यभर विवाह सुध्दा करीत नाहीत. त्यांचं हे प्रेम खरं असतं. प्रेमासाठी आपल्या जीवनाचा होम करणारे हे असे प्रेमिकही जगात आहेतच!
प्रेमभंगाचं दु:ख ज्याचं त्यानंच पचवायचं असतं. मित्र आणि परिवारातले लोक त्याला दिलासा देण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. प्रेमभंगावर काळ हेच उत्तर असलं तरी, प्रेमभंग झालेल्यांना, ते दु:ख विसरायला लावणारं रामबाण औषध आपल्याकडं असल्याचा दावा इस्तोनिया, या देशातल्या 588 वर्षांची परंपरा असलेल्या "रेआपटिक ड्रग स्टोअर्स'चा आहे. या देशातलंच नव्हे, तर जगातलंही हे सर्वात जुनं औषधाचं दुकान! तालीन शहरातल्या मुख्य चौकात 1422 मध्ये ते सुरू झालं. प्रेमभंगावरचं अत्यंत गुणकारी आणि जीवनाला नवी उमेद देणारं औषध याच दुकानात मिळतं, अशी या स्टोअर्सची शतकानुशतके प्रसिध्दी आहे. युरोपातले शेकडो प्रेमभंग झालेले युवक आणि प्रेमवीर हे औषध घ्यायसाठी या दुकानात येतात. त्यांना या औषधाचा गुणही येतो, असं हे दुकान चालवणारी फार्मासिस्ट युली नुडपेरा हिचं म्हणणं आहे. हे औषध घेतल्यावर त्याचा प्रेमभंग झालेल्या रुग्णावर जादुई परिणाम होतो. त्याच्या मनातली निराशा नाहिशी होते. काही दिवसातच तो प्रेमभंगाचं दु:ख साफ विसरूनही जातो. आपल्या जीवनात काही आता अर्थ राहिला नाही, हे जीवन संपवावं, अशी निराशेची त्याच्या मनातली जळमटं नाहिशी होतात, असं हे प्राचीन औषध असल्याचं तिचं म्हणणं आहे.
पूर्णपणे आयुर्वेदिक असलेल्या या औषधात बदाम आणि अन्य जडी बुटींचा वापर केला जातो. अन्य वनस्पती कोणत्या हे मात्र या औषधालयानं शतकानुशतके गुप्तच ठेवलं आहे. प्रेमभंगावर अक्षीर गुणकारी असलेल्या या औषधाची किंमत एक युरो म्हणजे 64 रुपये इतकी अल्प आहे. याच दुकानात प्राचीन औषधांचे संग्रहालय आहे. ही औषधं आता वापरात नाहीत. पण लोकांना ही मध्ययुगीन औषधं पहायला मिळतात. प्राचीन औषधांचंही जगातलं हे एकमेव संग्रहालय! प्रेमभंगावर औषध देणारंही हेच एकमेव औषधालय
असावं!