|
|
|
सातारा नगराध्यक्षपदी सौ. सुजाता भोसले यांची निवड निश्चित
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:31 AM (IST)
सातारा, दि. 9 : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष- पदासाठी नगरविकास आघाडीतील महिला व बालकल्याण सभापती सौ. कविता देगावकर व सौ. सुजाता भोसले या दोन महिलांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र नगरविकास आघाडीचे नेते आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सौ. सुजाता भोसले यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याने नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी सौ. भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे नगराध्यक्षपदावर त्यांच्या नावाचे शिक्कामोर्तब झाले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमीलनानंतर सातारा पालिकेत दोन्ही आघाड्या सत्तेवर आल्या. नगराध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्ष विभागून घेण्यात आले. गेल्या वर्षी नगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीच्या नगरसेविका सौ. वैशाली महामुनी यांना संधी मिळाली. त्यावेळी नगराध्यक्षपद इतर मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने नगरविकास आघाडीत इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांना समान संधी देण्यासाठी या पदाची भूमिका स्पष्ट करुन संबंधित सर्वांना शहराचा प्रथम नागरिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. इच्छुकांना नाराज न करता 6 महिने, 3 महिने नगराध्यक्षपद देवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अल्पकाळ का होईना नगराध्यक्ष बनण्यासाठी दोन्ही आघाडीमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. नगरविकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे परदेश दौऱ्यावरुन परतताच मावळत्या नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी यांना राजीनामा देण्यास सांगितले. नेत्यांच्या आदेशान्वये शुक्रवार, दि. 5 रोजी त्यांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. रिक्त पदावर नेमणूक करण्यासाठी दि. 15 रोजी निवड कार्यक्रम घोषित झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी नगरविकास आघाडीतून महिला व बालकल्याण सभापती सौ. कविता देगावकर, नगरसेविका सौ. सुजाता भोसले यांची नावे पुढे आली. सौ. भोसले यांची या पदावर वर्णी लावण्यासाठी ज्या नगरसेवकांनी मावळत्या अध्यक्षा सौ. महामुनी यांना राजीनामा देण्यास भाग पाडले त्याच नगरसेवकांनी सौ. भोसले यांच्या नावाचा आग्रह धरल्याने सौ. भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा शहरात आहे. सौ. कविता देगावकर या इतर मागास प्रवर्गातील असल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठी आपल्या हितचिंतक नगरसेवकांमार्फत नेत्यांकडे मोर्चेबांधणी करुन प्रयत्न केले. तथापि सौ. देगावकर या सध्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असल्याने त्यांच्या ऐवजी सौ. भोसले यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका बहुसंख्य नगरसेवकांनी नगरविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांकडे केली. नेत्यांनी नगरसेवकांच्या मतांचा कौल घेऊन सौ. भोसले यांच्या नावाला संमती दर्शवत ग्रीन सिग्नल दिला. सातारच्या नगराध्यक्ष निवडीसाठी पालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनात आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. बैठकीनंतर सौ. भोसले यांनी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. या पदासाठी आघाडीतून एकमेव त्यांचाच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदावर त्यांची निवड निश्चित झाली आहे.
फोटो गॅलरी
|