किर्लोस्कर उद्योग समूहाची शताब्दी
वासुदेव कुलकर्णी
Wednesday, March 10, 2010 AT 12:51 AM (IST)
देशाच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घालणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहाचा शताब्दी सोहळा 10 मार्च रोजी (आज) किर्लोस्करवाडीत साजरा होत आहे. देशात आणि जगभरात अभियांत्रिकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या किर्लोस्कर उद्योग समूहाची पायाभरणी बरोबर 100 वर्षांपूर्वी औंध संस्थानातल्या कुंडल जवळच्या ओसाड माळरानावर झाली. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी या भूमीत नव्या उद्योगाचा पाया जिद्दीने घातला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी, किर्लोस्कर उद्योगनगरी उभारली. पुढे किर्लोस्करवाडी याच नावाने या नगरीचा लौकिक झाला. धुळवडीच्या दिवशी त्यांनी या उघड्या माळावर देशाच्या औद्योगिक प्रगतीचे स्वप्न पहात, कारखाना उभारला. ते आणि त्यांचे बंधू रामुअण्णा, कामगार हे सारे जण उघड्या माळावर ठोकलेल्या तंबूतच रहात असत. या सर्वांची रहायची सोय करायच्या आधी लक्ष्मणरावांनी कारखान्याची शेड उभारली. किर्लोस्करांच्या या कारखान्यातून पहिला लोखंडी नांगर तयार झाला. त्या काळात जमीन लोखंडी नांगराने नांगरायचे धाडसही शेतकरी करीत नव्हते. लक्ष्मणरावांनी हा नांगर कसा चालवायचा, याचेही प्रात्यक्षिक परिसरातल्या शेतकऱ्यांना दिले. या नांगराची कीर्ती देशभर पसरली. सध्याच्या यांत्रिक कृषी क्रांतीचा प्रारंभ याच किर्लोस्करवाडीत झाला.
प्रारंभीच्या काळात फौंड्रीसाठी पिग आयर्न मिळत नव्हते, तेव्हा छ. शाहू महाराजांनी आपल्या संस्थांनातल्या जुन्या तोफा लक्ष्मणरावांना दिल्या. बघता बघता किर्लोस्करवाडी ही औद्योगिक नगरी अहोरात्र विविध यांत्रिक उत्पादने निर्माण करायला लागली. शेंगा फोडण्याचे यंत्र, कडबा कापण्याचे यंत्र, उसाचा चरक अशी यंत्रे या नगरीत निर्माण झाली. शेतीचे झपाट्याने यांत्रिकीकरण सुरू झाले.
लक्ष्मणरावांचे बेळगावला सायकलींचे दुकान होते. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी लक्ष्मणरावांकडे आपल्या संस्थानात कारखाना सुरू करायचा आग्रह धरला. त्यांनी कुंडल रोड रेल्वे स्टेशनजवळचा हा फोंडा माळ पसंत केला. लक्ष्मणरावांच्याकडे कारखाना उभारायसाठी भांडवलही नव्हते. पंतप्रतिनिधींनी सावकाराकडून दहा हजार रुपयांचे कर्ज काढून ते लक्ष्मणरावांना बिनव्याजी दिले. पुढे कारखान्याची भरभराट अल्पावधीतच झाली आणि अवघ्या दोन वर्षात त्यांनी या कर्जाची परतफेडही केली. संपूर्ण भारतीय बनावटीचा स्वदेशी नांगर तयार करणाऱ्या किर्लोस्कर कारखान्यातून पुढे ऑईल इंजिन, मोटार पंप, कूपनलिकेचा हातपंप अशी विविध शेती उपयोगी उत्पादने निर्माण होऊ लागली.
किर्लोस्करांच्या उत्कृष्ट बनावटीच्या दर्जेदार यंत्रसामुग्रीचा देशभर लौकिक झाला. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया या छोट्या नगरीतच घातला गेला. लक्ष्मणरावांचे बंधू रामुअण्णा यांनी किर्लोस्करवाडीत औद्योगिक नगरी अत्यंत नियोजनपूर्वक वसवली. मालक आणि कामगारांची नवीच संस्कृती या नगरीत नांदायला लागली. एककाळच्या उघड्या बोडक्या माळावर यंत्रांची घरघर अहोरात्र सुरू राहिली. किर्लोस्करवाडीच्या परिसराचाही झपाट्याने विकास झाला. सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात लोकप्रियता मिळवलेल्या किर्लोस्कर खबर मासिकाचा प्रारंभही याच किर्लोस्करवाडीत झाला. पुढे किर्लोस्कर खबरचे किर्लोस्कर मासिकात रुपांतर झाले. किर्लोस्कर-स्त्री आणि मनोहर ही मासिके मराठी साहित्य क्षेत्राची मानचिन्हं ठरली.
किर्लोस्करवाडीत नव्या औद्योगिक संस्कृतीची पहाट झाली तेव्हा, शंतनुराव किर्लोस्कर लहान होते. पुढे लक्ष्मणरावांनी त्यांना अमेरिकेत अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी पाठवले. शिकून परत आल्यावर त्यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा देशभर विस्तार केला. पुणे, हरिहर, देवास आणि शूले (जर्मनी) येथे किर्लोस्करांचे कारखाने सुरू झाले. अभियांत्रिकी क्षेत्रातल्या अनेक यंत्रांची निर्मिती सुरू झाली. भारताच्या औद्योगिक क्षेत्रात, "किर्लोस्कर उद्योग समूह' अग्रणी राहिला. महात्मा गांधीजींनीही लक्ष्मणरावांनी सुरू केलेल्या औद्योगिक क्रांतीची प्रशंसा केली. किर्लोस्करांच्या सूत कातायच्या यंत्रावर महात्माजींनी स्वत: सूतही कातले. पं. जवाहरालाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी यांनीही किर्लोस्करांच्या औद्योगिक विकासाची प्रशंसा केली. भारतातल्या शेतकऱ्यांची तर किर्लोस्करची उत्पादने मित्रच ठरली. सध्या 7 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आणि 11 हजार कर्मचारी असलेल्या किर्लोस्कर उद्योग समूहाची किर्लोस्करवाडी ही जन्मभूमी आहे. किर्लोस्करांची चौथी पिढी इंजिनिअरिंग क्षेत्रातच काम करते आहे. आपल्या औद्योगिक प्रगतीबरोबरच महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला दिशा आणि नव्या लघुउद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या या उद्योगाची अशी ही एका नांगरापासून सुरू झालेली प्रगतीची कहाणी!