भरधाव जीपची भिक्षुक दांपत्यास धडक पत्नी जागीच ठार, पती अत्यवस्थ
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:43 AM (IST)
कराड, दि. 9 : बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या अंध व बधीर भिक्षुक दांपत्यास जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 65 वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कराड-तासगाव मार्गावरील मार्केटयार्ड परिसरात घडली. दरम्यान त्या जीपचालकाने गाडीसह घटनास्थळावरुन पोबारा केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा येथील आदम हुसेन नदाफ (वय 76) आणि त्यांची पत्नी सौ. जुलेखा आदम नदाफ (वय 65) हे दांपत्य अंध व बधीर असून ते कराड शहर व परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे दांपत्य मंगळवारी शहरातील गूळ मार्केट परिसरात असलेल्या गेट क्र. 1 समोरील कराड-तासगाव मार्गाकडेला भिक्षा मागत एकमेकांचा आधार घेवून उभे राहिले असताना अचानक भरधाव वेगाने बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी जीप (क्र. एम. एच.11 एफ 1210) नेे या दांपत्यास जोराची धडक दिली. त्यामुळे हे दांपत्य मार्गाकडेला रक्तबंबाळ स्थितीत पडले होते. त्या परिसरातील जागरुक नागरिकांनी तातडीने ही घटना शहर पोलिसांना कळवून दोघांना तातडीने येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कृष्णा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना गंभीर जखमी झालेल्या सौ. जुलेखा आदम नदाफ या वृध्द महिलेचा मृत्यू झाला, तर आदम नदाफ हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या अपघातानंतर सदर जीपचालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार रामराव अडसूळ, प्रकाश निकम, सावंत तपास करत आहेत.