बारामती येथे वसुंधरा महोत्सवाचे आयोजन
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:56 AM (IST)
बारामती दि. 9 : जगामध्ये ग्लोबल वार्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र जनजागृती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी "बारामती वसुंधरा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. बारामती येथील वसुंधरा क्लब व किर्लोस्कर यांच्या सहकार्याने गुरुवार, दि. 11 ते 13 मार्च दरम्यान हा महोत्सव होणार असल्याची माहिती महोत्सवाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारामती औद्योगिक वसाहतीमधील विद्यानगरीतील गदिमा सभागृहात दि. 11 मार्च रोजी 11 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी सकाळी 9 वाजता कसब्यातील शिवाजी उद्यानापासून भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभापर्यंत पर्यावरण रॅली काढण्यात येणार आहे. भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभानजिक विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानविषयक प्रयोगांचेही प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान दि. 11 ते 13 मार्च दरम्यान दररोज तीन सत्रात विद्यार्थ्यांना निवडक चित्रपट दाखविले जाणार आहेत.
तसेच दि. 11 मार्च रोजी सकाळी व्ही. आय. आय. टी. मान्यवरांसाठी "स्थानिक वृक्ष लागवड' या विषयावर प्रा. श्री. द. महाजन यांचे व्याख्यान तर सायंकाळी 6 वाजता पर्यावरण तज्ज्ञ किरण पुरंदरे विद्यार्थ्यांपुढे पर्यावरणाशी निगडीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. 12 रोजी सकाळी सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्यामध्ये मुलांना पक्षी व वृक्षांची ओळख करुन दिली जाणार आहे. त्याच दिवशी रात्री 8 ते 10.30 वाजपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे आकाश दर्शनाचा लाभ घेऊन आनंद लुटता येणार आहे. दि. 12 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान बारामतीतील ऐतिहासिक वास्तूंची ओळख मुलांना करुन दिली जाणार आहे. रात्री 8 ते 10 यावेळेत गदीमामध्ये "चैत्रपालवी' हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाचा समारोप दि. 13 रोजी होणार असून सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान डॉ. हेमा साने यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 4 वाजता पर्यावरणावर काम करणाऱ्या एका मान्यवरास "वसुंधरा पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे.