Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रणजी खेळण्यास पुन्हा संधी मिळू दे विनोद कांबळीचे साईबाबांना साकडे
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:50 AM (IST)
Tags: sports
शिर्डी, दि. 9 (वृत्तसंस्था) : मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी, क्रिकेटमधून निवृत्त झालेलो नाही. रणजी खेळण्यासाठी मी पुन्हा उत्सुक आहे. कसून सराव आणि व्यायाम सुरू आहे. सचिन वयाच्या 37 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी उभारू शकतो तर मग माझी बॅट पुन्हा का तळपू नये? मला संधी मिळू दे, अशी प्रार्थना विनोद कांबळी याने मंगळवारी साईबाबांकडे केली.
लहरी स्वभाव व कामगिरीत सातत्य न राखता आल्याने क्षमता असूनही विनोदला आंतरष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागले. दूरचित्रवाणीचा छोटा पडदा चित्रपट आणि राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करूनही त्याच्या पदरात फारसे काही पडले नाही, त्यामुळे आता त्याला पुन्हा क्रिकेटचे वेध लागले आहेत.
सचिनने दोनशे धावांचा विक्रम केल्यापासून मलाही स्फूर्ती मिळाली आहेत. माझे हात शिवशिवत आहेत. मैदानावर जावे आणि धडाकेबाज फलंदाजी करावी, मी टायर्ड नाही आणि रिटायर्ड व्हायची इच्छा नाही तर गोलंदाजांना रिटायर करायला मी उत्सुक आहे, असे चौकारही त्याने यावेळी लगावले. मी सध्या संधी मिळण्याची प्रतीक्षा करतो आहे. रणजी प्रवेशासाठी आहारावर नियंत्रण आणून वजन कमी केले आहे. रोज व्यायाम आणि सराव सुरू आहे असेही तो म्हणाला.
यापूर्वीची कामगिरी लक्षात घेऊन संधी मिळेल अशी त्याला अपेक्षा आहे. माझ्यात आणि सचिनमध्ये केवळ एक वर्षाचा फरक आहे. तो वयाच्या 37 व्या वर्षी विश्वविक्रम करतो, माझे वय त्याच्यापेक्षा एक वर्षाने अधिक आहे. मी रणजी स्पर्धांत बॅट तळपविण्याचे स्वप्न का पाहू नये, असा प्रश्न त्याने आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये असावेत, असे एक खेळाडू म्हणून माझे मत आहे. मात्र, भारतीय म्हणून पाकिस्तानी व ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमध्ये येऊ नये असे मला वाटते. सचिन विश्वरत्न आहे. त्याला यापूर्वी भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा होता असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याने येथे येऊन आज दुपारी साडेबाराच्या सुमारास साईदर्शन घेतले. त्याच्या समवेत श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे व तेथील नगरसेवक अंजुम शेख होते. साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी या सर्वांचे स्वागत केले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: