अभिनव बॅंक
वासुदेव कुलकर्णी
Wednesday, March 10, 2010 AT 09:53 PM (IST)
झारखंड राज्यात आदिवासी जाती-जमातींची संख्या अधिक. गर्द जंगलांनी वेढलेल्या भागात आदिवासी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत आणि गरिबीत राहतात. या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने, सावकार त्यांना लुटतात, लुबाडतात. आजारपण, सण-समारंभ आणि कौटुंबिक अडचणींसाठी आदिवासी गावातल्या सावकाराकडून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जावर घेतात. या कर्जाला वार्षिक पंचवीस ते पन्नास टक्क्यांपर्यंतचे भरमसाठ व्याज सावकार आकारतो. त्यामुळेच सावकाराच्या या कर्जानेच आदिवासी घाईला येतात. कर्जाची कितीही परतफेड केली तरी, व्याज फिटते, पण मुद्दल मात्र फिटत नाही. काही आदिवासींनी तर वीस-वीस वर्षे सावकाराच्या कर्जाची परतफेड करायसाठी, त्याच्या शेतात-घरात वेठबिगारी केल्याच्याही घटना घडल्या आहेत, घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी सावकारांच्या पाशातून आदिवासी समाजाची मुक्तता करायसाठी अंमलात आणलेल्या योजनाही पूर्णपणे यशस्वी झालेल्या नाहीत. पावसाळ्याच्या चार महिन्यात आदिवासींना शंभर दोनशे रुपयांसाठीही सावकाराचे उंबरे अद्यापही झिजवावेच लागतात. सहकारी बॅंकांकडून त्यांना कर्ज मिळवायसाठी हेलपाटे घालावे लागतात.
आदिवासींची ही आर्थिक कोंडी फोडून, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणारा अभिनव प्रकल्प दहा वर्षांपूर्वी गिरीडोह जिल्ह्यातल्या बेंगालादमा तालुक्यातल्या करमजोरा गावात सुरू झाला. तो सुरु करताना आदिवासींची आर्थिक गरज भागवणे एवढाच हेतू होता. सावकाराच्या विळख्यातून या गावातल्या आदिवासींना मुक्त करायच्या हेतूने काही महिलांनी आपल्या जवळचे शंभर- सव्वाशे रुपये जमवून छोटी भिशी सुरू केली. या भिशीतून ऐनवेळच्या अडीअडचणींना आदिवासी महिलांना उसनवार पैसे अत्यल्प व्याजाने मिळू लागले. या भिशीचे महत्व निरक्षर-अडाणी आदिवासी महिलांना पटले. त्या आपल्या जवळची बचत या भिशीत जमा करायला लागल्या. बघता बघता या अनौपचारिक बचत गटाकडे हजारो रुपयांची रक्कम जमली. गावातल्या सावकाराकडे पैशासाठी जायची गरज राहिली नाही. गावातल्या सावकाराच्या पाशातून या गावच्या महिला पूर्णपणे मुक्त झाल्या.
याच प्रकल्पातून "इथिका वित्त अभिक्रम बॅंके'ची स्थापना झाली. बॅंकेचे महत्व करमजोरा आणि परिसरातल्या हजारो आदिवासी महिलांना पटले होते. सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत न घेताच, या बॅंकेच्या सदस्य महिलांनी अल्पबचतीतून पाच लाख रुपयांचे भांडवल हळू हळू जमा केले. सध्या या बॅंकेच्या 475 महिला सदस्या आहेत. सदस्य असलेल्या महिलांनाच आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी या बॅंकेकडून बिनव्याजी अल्प मुदतीचे कर्ज मिळू शकते. बॅंकेत खाते उघडायसाठी एक रुपया ही चालतो. अमकीच रक्कम हवी, अशी अट नाही. त्यामुळेच खातेदार महिला एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यात जमा करतात. कोणत्याही महिलांना या बॅंकेचे सदस्यत्व लगेचच मिळते. त्यासाठी कागदपत्रांचे जंजाळही नाही. कर्जही जामिनाशिवाय दिले जाते. सध्या या परिसरातल्या 26 स्वयंरोजगार महिला गटांना पाच लाख रुपयांचे कर्ज इथिका बॅंकेने दिले आहे. या कर्जाची परतफेडही वेळच्या वेळी सुरू आहे. आतापर्यंत दिलेल्या कर्जातला रुपयाही बुडालेला नाही.
बॅंकेचे व्यवस्थापन आणि संचालन महिलाच करतात. महिलाच बचतही गोळा करतात. कर्जाची वसुली करतात. या बॅंकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शी तर आहेच, पण ही बॅंक सातही दिवस आणि चोवीस तास उघडी असते. मध्यरात्रीही महिला सदस्यांना आपल्या खात्यातली रक्कम किंवा तातडीचे कर्ज अवघ्या पाच मिनिटात मिळू शकते.बॅंकेचे व्यवस्थापन करणाऱ्या महिला कोणतेही वेतन किंवा मानधन घेत नाहीत. महिलांनी, महिलांच्या उन्नतीसाठी चालवलेली अशी ही देशातली एकमेव अभिनव बॅंक असावी! आता याच बॅंकेच्या कार्याचा विस्तार झारखंडच्या अन्य खेड्यातही सुरू झाला आहे.