आयपीएल यशस्वी होणारच : ललित मोदी
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 01:51 AM (IST)
मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) : उपग्रह वृत्तवाहिन्यांनी जरी इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असला तरी 12 मार्चपासून सुरू होत असलेली ही स्पर्धा यशस्वी होणारच, असा विश्वास या ट्वेंटी-20 लीग स्पर्धेचे प्रमुख ललित मोदी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मोदी यांना अजूनही अशी अपेक्षा आहे की, उपग्रह वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांनी या सामन्यांचे वार्तांकन जरुर करावे.
मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या स्पर्धेची तयारी मोठ्या गतीने पूर्ण होत असून आम्ही सर्वजण तयार आहोत. आम्ही उद्घाटन समारंभाची सर्व तयारी चांगल्या प्रकारे केली असून त्याचे मुख्य आकर्षण लेझर शो राहणार आहे. ते म्हणाले, उपग्रह वृत्त वाहिन्यांचा बहिष्कार जरी सुरू असला तरी त्यांनी पहिल्यांदा नवा प्रस्ताव मंजूर केला होता. ते म्हणाले, नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशन (एनबीए) चे प्रकरण खूपच वेगळे आहे. आयपीएल व्यवस्थापन आणि एनबीएचे प्रतिनिधी यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये आम्ही आमच्या काही नियमांमध्ये फेरबदल करण्यासाठी तयार होतो. त्यावेळी ते देखील या फेरबदलांसाठी तयार झाले होते. पण, अचानक काल रात्री ते आले आणि त्यांनी यापेक्षा आणखी काही नियमांमध्ये फेरबदल करण्याची मागणी करू लागले होते. पण, त्यावर आमच्या व्यवस्थापनाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मला असे वाटते की, सर्वांनी या स्पर्धेचे वार्तांकन करावे पण, नव्या नियमांनुसार नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, आयपीएल आणि एनबीए-मधील वादाचा मुद्दा आयपीएलच्या फुटेजवरुन निर्माण झाला आहे. पण, त्याचा अधिकार मुख्य प्रसारक "सोनी'कडे सुरक्षित आहे. असे असले तरी मोदी या वादाच्या मुद्द्यावर खूपसे गंभीर नसून त्यांना अपेक्षा आहे की, आयपीएल सामन्यांदरम्यान सर्वांच्याच टीआरपी रेटिंगमध्ये फार मोठी वाढ होईल. आपले सर्व प्रेक्षक आयपीएल सामन्यांचे प्रक्षेपण सोनी आणि यू ट्यूबवर पाहू शकतील, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.