Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिंगणापूरच्या वार्षिक यात्रेत प्रशासनास सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 11:31 PM (IST)
शिंगणापूर, दि. 11 : केवळ प्रशासनावर अवलंबून न रहाता भाविक यात्रेकरू कावडीधारकांनी स्वयंशिस्त पाळून शिखर शिंगणापूरच्या वार्षिक चैत्री यात्रेस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी यात्रा नियोजन बैठकीत शिंगणापूर भक्तनिवास येथे केले.
दुपारी 3 वाजता घेण्यात येणाऱ्या बैठकीत ऐनवेळी बदल करुन दुपारी 1 वाजता बैठक घेण्यात आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीस फलटणचे प्रांताधिकारी बी. एस.पऱ्हाड, माण तहसीलदार मिनाज मुल्ला, माण गटविकास अधिकारी जाधव, प्रादेशिक पाणी पुरवठा सह सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्यावतीने या बैठकीस विशेष उपस्थित राहणाऱ्या राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा सत्कार व उपस्थितांचे स्वागत शिंगणापूरच्या  सरपंच सौ. सुलभा सुरेशराव बडवे, उपसरपंच राजाराम बोराटे यांनी केले.
उन्हाळी हंगामात येणाऱ्या चैत्री यात्रेपूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी सुरु न झालेस प्रचंड पाणी टंचाई जाणवणार असल्याने यात्रेपूर्वी जीवन प्राधिकरणास पाणी सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याशिवाय स्वतंत्र टॅंकरची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. चालू वर्षी पुष्कर तलाव काठोकाठ पाण्याने भरला असल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी स्वतंत्र संरक्षण व्यवस्था पुष्कर तलाव काठावर ध्वनिक्षेपक, रात्रभर उजेडाची व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यात्रा तळावर  व एकूणच शिखर विभाग शिंगणापूर परिसरामध्ये नाहक गर्दी, गोंगाट, रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशी अतिक्रमणे करणारांवर कडक कारवाई केली जाणार असून हॉटेल व्यावसायिकांनी अनधिकृत गॅस कनेक्शन्स वापरु नयेत. कोणत्याही प्रकारचे खाजगी वाहन यात्रा ठिकाणी आणण्यास सक्त मनाई केली आहे.
देवस्थान कमिटीने मंदिर परिसरातील भाविकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने निर्जंतुक व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करुन दक्षता समिती, स्वयंसेवी संघटना यांना कार्यरत करावे. ठिकठिकाणी कंट्रोलरुम उभारण्यात यावे, सूर्यास्तापूर्वी कावडीधारकांनी मुंगी घाटातून कावडी वर आणाव्यात अशा सूचना करुन शिंगणापूर यात्रेस कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. प्रांताधिकारी पऱ्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: