विविध दाखले पोहोच देण्याच्या उपक्रमास म्हसवड येथे प्रतिसाद
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 11:34 PM (IST)
म्हसवड, दि. 11 : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत माणचे तहसीलदार यांनी म्हसवड व परिसरातील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या जातीचे दाखले व नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पोहोच देण्याच्या उपक्रमास म्हसवड येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी विविध दाखल्यांची गरज असते. हे दाखले मिळण्यासाठी पालकांना तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत म्हसवड येथील सिध्दनाथ हायस्कूल, कन्या विद्यालय तसेच परिसरातील असणाऱ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची बैठक घेवून विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला व नॅशनॅलिटी सर्टिफिकेट शाळेतच देण्यात येणार असून त्यासाठी पूर्तता करण्यास सांगितले.
या दोन दाखल्यांसाठी बुधवारी गावकामगार तलाठी कार्यालयात कक्ष उघडण्यात आला होता. याठिकाणी तहसील कार्यालयातील कर्मचारी अर्ज जमा करत होते. हे अर्ज जमा करण्यासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने म्हसवड येथील गावकामगार तलाठी कार्यालयात आले होते. त्यामुळे या योजनेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पालकांना याठिकाणी गर्दी केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
फोटो गॅलरी