|
|
|
सर्वधर्मसमभाव आचरणात आणणे काळाची गरज ः जिल्हाधिकारी
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 11:32 PM (IST)
मायणी, दि. 11 ः ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत गाडगे महाराजांपासून अगदी मायणीचे यशवंतबाबांपर्यंत सर्व संतांनी महाराष्ट्राला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. हीच शिकवण आपण सर्वांनी जातीपाती विसरून आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी यशवंतबाबा रथोत्सवात रथपूजनप्रसंगी व्यक्त केले. प्रांताधिकारी बी. एस. पऱ्हाड, तहसीलदार प्रभाकर भगत, उपजिल्हा पोलीस अधिकारी संकपाळ, माजी आमदार भाऊसाहेब गुदगे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी यशवंतबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार यशवंतबाबा माने-पाटील ट्रस्टचे सचिव द. ग. माने यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मायणी शैक्षणिक मुक्तपीठ निर्माण झाले असून येथील सर्व समाज गुण्यागोविंदाने रहात आहे, लवकरच येथे उद्योगनगरी उभी राहणार असल्याचे सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले. भाऊसाहेब गुदगे म्हणाले, सद्गुरु यशवंतबाबा, श्री सिद्धनाथ, मुनीमहाराज, अंबरसाहेब ही मायणी ग्रामस्थांची श्रद्धास्थाने असून या श्रद्धास्थानांपासून आपण प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपले जीवन कृतार्थ करण्याच्यादृष्टीने मायणी जिल्ह्यात नंबर 1 वर रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. रथयात्रेत घोडदल, बॅंड, लेझीम पथक तसेच गुरुकुल अध्यापक विद्यालयाचे भजनी मंडळ सामील झाले होते. रथयात्रा सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक नवीपेठ, फुलेनगरमार्गे मुख्य चांदणी चौकात आल्यानंतर यात्रेला एकच बहर आला होता. यात्रेत दुतर्फा दुकाने, भांड्यांची दुकाने, मेवामिठाईची दुकाने, सहा सिनेमा तंबू दाखल झाल्याने यात्रेत उत्साह जाणवत होता. भाविक भक्त आपल्या ताकदीप्रमाणे रथावर नोटांच्या माळा अर्पण करून बाबांच्या ऋणातून मुक्त होत होते. यात्रेत खरसुंडी, खानापूर, आटपाडी, सांगोला, माळशिरस, कराड, सांगली या भागातून असंख्य दर्जेदार जनावरे दाखल झाली आहेत. यात्रा कमिटी व मार्केट कमिटी यांनी दिवाबत्ती व पाण्याची सोय केली होती. रथयात्रेस एस. पी. देशमुख, सुदाम घाडगे, चंद्रकांत पाटील, सभापती अशोक कदम, डी. एन. पाटील, विनोद पंडित, गटविकास अधिकारी इंदिरा कोळी, दगडू शिंदे, प्रकाश गुरव, अनिल गोडसे, प्रवीण शेटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सपोनि. प्रभाकर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फोटो गॅलरी
|