Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दत्ताजी गायकवाड यांच्यासारख्या दानशूर व्यक्ती निर्माण व्हाव्यात : धिवरे
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 11:29 PM (IST)
महाबळेश्वर, दि. 11 : शिक्षण क्षेत्रात विकासाच्या दिशेने जाणारे दत्ताजी गायकवाड यांच्यासारख्या चोखंदळ जाणकार, दानशूर व्यक्ती महाराष्ट्रात निर्माण झाल्यास व त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी योग्य सहकार्य मिळाल्यास निर्माण होणाऱ्या भावी पिढीसाठी पोलीस ठाणी, न्यायालय व वकील वर्गाची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी केले.
दत्ताजी गायकवाड यांच्या पुत्राच्या स्मरणार्थ  मेटगुताड येथे बांधण्यात येणाऱ्या  विद्यालयाच्या कोनशीला समारंभात ते बोलत होते.
दानशूर मंडळीचा कल मंदिरे व देवदेवतांच्या कारणासाठी धन देण्याकडे असतो. परंतु ज्यांना छत नाही, आश्रय नाही अशांकडे दुर्लक्ष होते. कै. चेतनच्या शैक्षणिक क्षेत्रातील विचारांचे कौतुक केले पाहिजे. उच्चशिक्षित असताना जनसामान्यांसाठी आपल्या धनाचा उपयोग सत्पात्री करण्याच्या विचारसरणीचे चेतन यांनी अनेकवेळा मत प्रदर्शित केले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याचा विचार दत्ताजी गायकवाड यांनी केला. त्यांचे मोठेपण येथेच सिध्द होत आहे. जाणीवा व विचार जेथे एकत्र येतात तेथेच शैक्षणिक प्रगतीस वाव असतो. दत्ताजी गायकवाड यांनी मेटगुताड निवडल्याबद्दल धिवरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.   संस्थेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी प्रास्ताविकात शाळेचा भूतकाळ सांगितला. बावळेकर पुढे म्हणाले, दत्ताजी गायकवाड यांच्या सढळ मदतीने येथील विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यास मदतच होईल. कै. चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय असे नाव या प्रशालेचे होणार असल्याचे त्यांनी घोषित केले. जागतिक आव्हान स्वीकारण्यासाठी शिक्षणातील विविध शाखा येथे सुरु करण्याचा विचार आहे. संगणक कक्ष व शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, शिक्षक ट्रेनिंग स्कूल अशा अनेक शिक्षणांची मुहूर्तमेढ येथे करण्याची घोषणाही त्यांनी केली. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून दत्ताजी गायकवाड यांनी सुसज्ज विद्यालयाची संकल्पना स्वागतार्ह असून संस्था सर्वतोपरी चेतन गायकवाड यांच्या स्मृती जागृत ठेवून शिक्षणाचे पवित्र काम चालू ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
दत्ताजी गायकवाड यांनी आपल्या स्वर्गवासी चिरंजीव चेतनच्या शिक्षणाबाबतच्या दृष्टिकोनाचा परामर्श घेतला. शिक्षण क्षेत्रात गरजू तसेच हुशार विद्यार्थ्यांसाठी भरीव मदत करण्याचे स्वप्न साकार होण्यापूर्वी काळाने त्याच्यावर घाला घातला. अत्यंत भावूक शब्दात त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगून आपण येथे कोठेच कमी पडणार नसल्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये स्वाभिमान वाढवण्याची इच्छा आपल्या चिरंजीवाची होती. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची चेतनची इच्छा मी आज पूर्ण करत असल्याचे समाधान आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ कोनशीला समारंभ व सरस्वती पूजनाने झाला. याप्रसंगी अशोक धिवरे व त्यांच्या पत्नी कुंदाताई, दत्ताजी गायकवाड व त्यांच्या पत्नी वैदेही, डी. एम. बावळेकर, बबनराव बावळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी दत्ताजी गायकवाड यांचे जावई जयप्रकाश गिरमे उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वाशिलवले यांनी केले. प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थिनीनी स्वागत केले. सौ. कुंदाताई धिवरे व वैदेही गायकवाड यांचा सत्कार सौ.सुलोचना बावळेकर यांनी केला. तुकाराम बावळेकर यांनी आभार मानले.
मेटगुताड येथील साई विकास संस्थेच्यावतीने स्थानिक मंडळींकडून शिक्षण संस्था चालवली जाते. अल्प कालावधीत दर्जेदार शिक्षणासाठी शाळेचा नावलौकिक झाला आहे. संस्थेच्या स्थापनेवेळी गावकऱ्यांनी सुमारे 2 एकर जागा संस्थेस दिली. दत्ताजी गायकवाड यांच्या नियोजित इमारतीसाठी 27 गुंठे जागा वापरण्यात येणार असून 14 वर्ग व एक मोठे सभागृह, सुसज्ज प्रयोग, संगणक कक्षाची योजना असून शालेय शिक्षणासाठी सर्वतोपरी सुविधा दत्ताजी गायकवाड यांच्यावतीने देण्यात येणार आहेत.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: