Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताच्या दोन बॉक्सरची सोनेरी कामगिरी
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:08 AM (IST)
Tags: national
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : इराणमधील तेहरान येथे झालेल्या आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णन (60 किलो) व नवीनकुमार (81 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. अन्य तीन भारतीय बॉक्सरना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
देवेंद्रोसिंग लशिराम (48 किलो), वेंकटगिड्डी नागार्जुन (57 किलो) व सुमित सांगवान (75 किलो) यांना अंतिम फेरीतील मुकाबल्यामध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे या तिघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून पराभव पत्करणाऱ्या चार भारतीय बॉक्सरनी कांस्यपदके मिळवली. या कामगिरी-मुळे सांघिक गुण तक्त्यात दुसरे स्थान मिळवले. भारताचे 28 गुण झाले तर अव्वल स्थान मिळवणाऱ्या कझाकस्तानचे 34 गुण झाले.
 अंतिम फेऱ्यांमधील सर्वात पहिली लढत 48 किलो गटात झाली. त्यात देवेंद्रोसिंगला इराणच्या मसूद रिगीने 5-0 असे नमवले. त्यानंतर नागार्जुनने निराशा केली. त्याला कझाकस्तानच्या यर्किन डुसेनबायेव 10-2 असे पराभूत केले. मात्र विकास कृष्णनने भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. त्याने थायलंडच्या फोनविराट पटियहॅंगखो याला 4-0 असे नमवून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर सुमित सांगवानला चीनच्या यिहहॅंग वेनने 4-0 ने पराभूत केले. मात्र नवीनकुमारने चीनच्याच ओलिह झॅंगवर 4-2  अशी मात करुन सुवर्णपदक मिळवले. भारतीय बॉक्सिंग संघाचे उद्या देशात आगमन होणार आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: