Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

फिरकीला तोंड देण्यास इंग्लंड सज्ज
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 01:14 AM (IST)
Tags: sports
चित्तगाव, दि. 11 (वृत्तसंस्था) : बांगलादेशविरुध्द उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकी आक्रमणाला तोंड देण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. दोन कसोटींच्या या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवायचा असेल तर त्यांना अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही.
वनडे मालिकेत बांगलादेशला व्हाईटवॉश देणाऱ्या इंग्लंडला कसोटी मालिकेत मात्र फिरकी आक्रमणाचा मुकाबला करावा लागेल. इंग्लिश फलंदाजांसमोर ते एक आव्हानच आहे.
बांगलादेशविरुध्द कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत न झालेला इंग्लंडचा संघ एकमेव आहे. ही स्थिती बदलण्याचा बांगलादेशचा निर्धार असेल. त्यासाठी त्यांचा भर फिरकी आक्रमणावर असेल.
इंग्लंडनेही बांगलादेशला जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. या कसोटीत तेही दोन ऑफस्पिनर घेऊन खेळतील. नियमित फिरकीपटू ग्रॅमी स्वानच्या जोडीला जेम्स ट्रेडवेल हा पदार्पण करणारा फिरकीपटू असेल.
मात्र इंग्लंडला वेगवान गोलंदाजीची चिंता आहे. दुखापतीमुळे रायन साईडबॉटम मायदेशी परतला आहे तर पाठीच्या दुखण्यामुळे ग्रॅहॅम ओनियन्स पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे जलदगती माऱ्याचा भार स्टुअर्ट ब्रॉडला वहावा लागेल.
त्याशिवाय इंग्लंडला स्टार फलंदाज केव्हिन पीटरसनच्या फॉर्मची चिंता असेल. बांगलादेशविरुध्द एकदिवसीय मालिकेत त्याला चमक दाखवता आली नाही. त्याशिवाय तीन दिवसांच्या सराव सामन्यातही तो अपयशी ठरला होता. मात्र पहिल्या कसोटीत त्याला सूर गवसेल, अशी कर्णधार ऍलेस्टर कूकची आशा असेल.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: