Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताला 16 वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची संधी
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:11 AM (IST)
Tags: sports
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळालेला भारतीय हॉकी संघ गेल्या 16 वर्षांमधील सर्वोत्तम म्हणजे 7 वे स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी त्यांना उद्या अर्जेंटिनावर मात करावी लागेल.
जर्मनीतील मोंचेनग्लाडबाक येथे 2006 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला जवळपास तळाचे म्हणजे 12 संघांमध्ये 11 वे स्थान मिळाले होते. आठवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताने 1994 साली विश्वचषक स्पर्धेत पाचवे स्थान मिळवले होते. त्यापूर्वी 1975 साली मलेशियातील क्वालालंपूर येथे भारताने विश्वचषक जिंकला होता तर त्याआधी 1973 मध्ये नेदरलॅंडस्‌ (हॉलंड) ची राजधानी ऍमस्टलवीन येथील विश्वचषक स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता.
1994 नंतर भारताला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतचे सर्वोत्तम स्थान मिळवण्याची संधी चालून आली आहे. आक्रमक प्रवृत्तीच्या अर्जेंटिनाविरुध्द खेळताना ही बाब राजपालसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रेरित करेल, अशी कोट्यवधी हॉकीप्रेमींची अपेक्षा आहे.
गटसाखळीत पाच सामन्यांमध्ये फक्त 4 गुण मिळवणाऱ्या भारताला सातव्या व आठव्या स्थानासाठी होणाऱ्या प्ले-ऑफ सामन्यामध्ये खेळायला मिळाले, हे भारताचे सुदैवच म्हणायचे. स्पर्धेच्या सलामीलाच गटसाखळीत पाकला 4-1 असे नमवून शानदार शुभारंभ करणाऱ्या भारतीय संघाने देशातील हॉकी-प्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र नंतर त्यांची कामगिरी खालावत गेली. ऑस्ट्रेलिया, स्पेन व इंग्लंडविरुध्द पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाने दुबळ्या दक्षिण आफ्रिकेविरुध्द कशीबशी बरोबरी राखली होती.
उद्याचा दिवस राजपालच्या संघासाठी पूर्णपणे नवा असणार आहे. भारतीय संघ मंदगतीने का होईना पण निश्चित सुधारणा करत आहे, हे दाखवून देण्यासाठी राजपालच्या संघाला उद्या अर्जेंटिनाला नमवावेच लागेल. मात्र ती कामगिरी तशी कठीण आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: