Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन ना. पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष उपस्थिती
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:43 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 11 : सातारा जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचा ओबीसी विभाग आणि संत गाडगे महाराज (परीट धोबी) समाज संस्थेच्या वतीने रविवार, दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे सचिव प्रताप भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 
सातारा-कोरेगाव मार्गावरील संगमनेर येथे वेदभवन मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून या मेळाव्याचे अध्यक्षस्थान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील भूषवणार आहेत. यावेळी माजी खासदार आणि कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून माजी विधानसभा सभापती शंकरराव जगताप, सुधाकर गणगणे, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, प्रा. सत्यजित देशमुख, बाळासाहेब आंबेकर उपस्थित राहणार आहेत. प्रा. श्रीधर साळुंखे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध मान्यवर, कॉंग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास सर्व कार्यकर्ते व
नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तसेच संत गाडगे महाराज (परीट धोबी) समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सर्जेराव जांभळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ओबीसी विभागातर्फे ओ.बी.सी. रत्न पुरस्कार जाहीर
जिल्हा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे यंदापासून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा ओबीसी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंदा पहिल्या वर्षी सात व्यक्तिमत्वांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यंदा स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जंगम, सामाजिक कार्यकर्ते दिवकार पात्रेकर, संजय शंकर जाधव (वाढे), पत्रकार राहुल लव्हाळे, सिने अभिनेते समृद्धी जाधव, लक्ष्मण यादव आणि जाकीर हुसेन रज्जाक मुल्ला यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या मेळाव्यात सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय नवनिर्वाचित आमदार म्हणून जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर (पनवेल) आणि रयत शिक्षण संस्थेचे
को-ऑर्डिनेटर दत्ताजीराव सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: