|
|
|
सागरकन्या स्नेहलची उद्या कण्हेर धरणात साहसी मोहीम
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 01:13 AM (IST)
कुसुंबी, दि. 11 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लांब पल्ल्यांच्या जलतरण मोहिमा यशस्वी करुन सातारचे नाव उज्ज्वल करणारी सागरकन्या कु. स्नेहल कदम ही शनिवार, दि. 13 रोजी कण्हेर धरणात साहसी मोहीम पूर्ण करणार आहे. या मोहिमेदरम्यान ती कण्हेर धरणात मेढा ते चिंचणी हे 15 किलोमीटरचे अंतर बॅकस्ट्रोकने पोहून पार करणार आहे. स्नेहलच्या या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी सकाळी 8 वाजता मेढा-मोहाट पुलापासून होणार आहे. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, जावली पंचायत समितीचे सभापती बापूराव पार्टे, सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. वनिता गोरे, प्रांताधिकारी रामदास जगताप, तहसीलदार सुप्रिया बागवडे, जावली बॅंकेचे चेअरमन विजयकुमार भिलारे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्नेहलने आपले वडील सतीश कदम यांच्याकडून प्रेरणा घेऊन लांब पल्ल्याच्या जलतरणात आपला ठसा उमटवला आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किलोमीटर सागरी अंतर तिने सहावेळा विक्रमी वेळेत पार केले आहे. स्पेन ते मोरोक्को हे (स्टेट ऑफ जिब्राल्टर) 32 कि.मी. अंतर 22 ऑगस्ट 2001 रोजी 5 तास 55 मिनिटात पार केले होते. दि. 20 जुलै 2002 रोजी ग्रीसची टोरोनस गल्फ ही 26 कि.मी. खाडी 10 तास 46 मिनिटात, 2 ऑगस्ट 2002 रोजी पुन्हा जिब्राल्टर खाडी 6 तास 10 मिनिटात पूर्ण केली होती. 17 ऑगस्ट 2002 रोजी न्यूयॉर्क येथील रिव्हरसाईड पार्क ट्राय-टून-अप ही जलतरण मोहीम पूर्ण करणारी स्नेहल ही सर्वात लहान व पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्याचदिवशी तिने अमेरिकेतील स्विम न्यूयॉर्क येथील ग्रेट हडसन नदीतील मोहीम 46 मिनिटे 34 सेकंद वेळेत पूर्ण केली होती. हा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 55 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून तिने 15 ऑगस्ट 2004 रोजी 57 किलोमीटर अंतरात वडिलांसमवेत रिले पध्दतीने 18 तासांच्या कालावधीत जलतरण केले होते. 6 फेब्रुवारी 2005 रोजी कोयना जलाशयात तापोळा ते बामणोली हे 11 कि.मी. अंतर तिने 2 तास 4 मिनिटे 44 सेकंदात पार केले होते. स्नेहलने 16 फेब्रुवारी 2005 रोजी संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया ही 5 कि. मी. अंतराची मोहीम केवळ 48 मिनिटे 57 सेकंदात फत्ते केली होती. दि. 1 डिसेंबर 2007 रोजी निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिने 50 मिनिटे 39 सेकंदात 3 कि. मी. अंतर पार करुन द्वितीय क्रमांक मिळवला होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजे दि. 27 मार्च 2008 रोजी तिने कण्हेर धरणात मेढा ते चिंचणी हे अंतर 3 तास 31 मिनिटे व 20 सेकंदात पार केले होते. त्याशिवाय गुजरातमधील वीर सावरकर सागरी जलतरण स्पर्धा, मुंबईत राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धा, मुंबई येथील राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा, अमृतसर येथे राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये तिने आपला ठसा उमटवला आहे. स्नेहलच्या कण्हेर धरणातील मोहिमेचा समारोप शनिवारी दुपारी 12.30 वाजता चिंचणी येथे होणार आहे. यावेळी ती वरदानीमाता तरुण मंडळ, चिंचणी ग्रामस्थ व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. तिच्या या मोहिमेचे कौतुक करण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडा-प्रेमी, जलतरणप्रेमी, क्रीडापटू, विद्यार्थी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा हौशी जलतरण संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
फोटो गॅलरी
|