महाराष्ट्राचे बजेट वाढवा मुख्यमंत्र्यांचा अहलुवालिया यांच्याकडे आग्रह
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 12:30 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : करांद्वारे उत्पन्न वाढविण्यामागे मर्यादा असतात. त्यात वारंवार वाढ करण्यात येत नाही. त्यामुळे उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत व्यक्त केले. केंद्रीय नियोजन आयोगाकडून विविध राज्यांना मंजूर करण्यात येत असलेला वार्षिक आराखडा सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी आज गुरुवारी दिल्लीत. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतली.
यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य प्रा. नरेंद्र जाधव, राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनील सोनी, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिन ए. के. जैन उपस्थित होते. महाराष्ट्रातील गरजा, तसेच इथले शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी योजनेत महाराष्ट्रासाठी बजेट वाढवून द्या, असा आग्रह त्यांनी अहलुवालिया यांच्याकडे केला. राज्याचा अर्थसंकल्प सादर व्हायचा आहे, त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. त्यासाठी नियोजन आयोगाकडून मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.