|
|
|
ऑस्ट्रेलियाने चॅपेल-हॅडली चषक जिंकला
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:09 AM (IST)
ऑकलंड, दि. 11 (वृत्तसंस्था) : चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चॅपेल-हॅडली चषक आपल्याकडेच राखला. कर्णधार रिकी पॉंटिंग व कॅमेरुन व्हाईट यांना या विजयाचे श्रेय दिले पाहिजे. डकवर्थ-लुईस नियमानुसार मिळालेले 200 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला या दोघांमुळेच 17 चेंडू राखून पार करता आले. या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने 44.1 षटकात 238 धावांत रोखले. सलामीवीर ब्रैंडन मॅक्युलमने यजमानांना धडाकेबाज सुरुवात करुन दिली. त्याने 61 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंडची मधली फळी गडगडली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या डॅरिल टफीने 17 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावा कुटल्याने न्यूझीलंडला 238 ची मजल मारता आली. टफीने ऑफस्पिनर नॅथन हॉरित्झला सलग तीन षटकार खेचले. हॉरित्झने 8 षटकात 46 धावा दिल्या, पण 3 गडीही गारद केले. मिशेल जॉन्सन, जेम्स होप्स व शेन वॉटसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ-लुईस नियमांचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 34 षटकात 200 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. शेन वॉटसन व रिकी पॉंटिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला स्थैर्य दिले. वॉटसनने 32 धावा केल्या तर पॉंटिंगने 34 चेंडूत 50 धावा केल्या. पॉंटिंगला व्हेट्टोरीने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या झटपट दोन विकेटस् गेल्या. मात्र कॅमेरुन व्हाईट (नाबाद 50) व माईक हसी (नाबाद 28) यांनी कांगारुंना विजय मिळवून दिला. ऍडम व्होग्जनेही 34 धावांचे योगदान दिले.
फोटो गॅलरी
|