पाकला कॅनडाचाही धक्का; संपूर्ण संघाचा राजीनामा
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:06 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : अचानक उसळी घेतलेल्या कॅनडाने जादा वेळेत पाकिस्तानचा पराभव करुन विश्वचषक हॉकी स्पर्धेत 11 वे स्थान मिळवले. या पराभवामुळे पाकच्या संघाची विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मानहानीकारक कामगिरी नोंदवली गेली. दरम्यान, या पराभवाचे खापर सदोष संघनिवडीवर फोडून पाक हॉकी फेडरेशनने निवड समितीच निकालात काढली आहे.
चार वेळच्या विश्वविजेत्या पाकिस्तानवर या स्पर्धेत सर्वात नामुष्कीजनक परिस्थिती ओढवली. गटसाखळीत भारताकडून सलामीलाच पराभव पत्करणाऱ्या पाकला नंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने नमवले होते. स्पेनविरुध्द त्यांनी विजय मिळवला असला तरी नंतर दुबळ्या दक्षिण आफ्रिकेने त्यांना नमवून 11 व्या व 12 व्या स्थानासाठी होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत खेळण्यास भाग पाडले.
स्पर्धेतील या अखेरच्या सामन्यात तरी पाकचा संघ विजय मिळवेल, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र पाक हॉकीपटूंनी त्यांची साफ निराशा केली. कॅनडाने जादा वेळेत गोल नोंदवून पाकला 3-2 असे पराभूत केले. पाकने निर्धारित वेळेत दोनदा आघाडी घेतली, पण ती त्यांना टिकवता आली नाही.
सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांची 2-2 अशी बरोबरी केल्याने सामना जादा वेळेत गेला. जादा वेळेच्या प्रत्येकी 10 मिनिटांच्या खेळात पाकला एकही गोल नोंदवता आला नाही. मात्र कॅनडातर्फे स्कॉट टपरने 83 व्या मिनिटाला गोल नोंदवून सरशी साधली. कॅनडाकडून कॉनर ग्राईम्स (12 वे), मार्क पीअर्सन (58 वे) व स्कॉट टपर (83 वे मिनिट) यांनी तर पाककडून रेहान बट्ट (4 थे मिनिट) व अख्तर अली (38 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. या पराभवामुळे पाकचा संघ तळाला फेकला गेला. हा संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही अपात्र ठरला आहे.
दरम्यान, या पराभवामुळे निराश झालेल्या पाक हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष कासिम झिया यांनी संपूर्ण संघ व्यवस्थापन व निवड समितीच बरखास्त केली आहे. विश्वचषक स्पर्धेत तळाच्या स्थानावर फेकले जाण्याची नामुष्की पाकवर प्रथमच ओढवली आहे.
कॅनडाच्या दुबळ्या संघावर गटसाखळीत त्यांचे "अ' गटातील प्रतिस्पर्धी वर्चस्व गाजवत असताना पाकिस्तानी हॉकीपटूंना मात्र त्यांना रोखता आले नाही. या दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यात फारसा फरक जाणवत नव्हता. रेहान बट्टने पूर्वार्धात मिळवून दिलेली आघाडी पाकला टिकवता आली नाही. कॅनडाने लगेचच बरोबरी साधली. उत्तरार्धातही अख्तर अलीमुळे पाकला मिळालेली आघाडी बचावपटूंच्या गचाळ खेळामुळे निसटली. या संपूर्ण स्पर्धेत स्पेनविरुध्दच्या लढतीचा अपवाद वगळता पाकची कामगिरी सुमार दर्जाची झाली. त्यातच कट्टर प्रतिस्पर्धी भारताने सलामीलाच दिलेली मात त्यांच्या जिव्हारी लागली होती.
या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पाक हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षांनी संघ व्यवस्थापन व निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पाक हॉकी वर्तुळात खळबळ उडाली आहे. क्रिकेट-प्रमाणेच पाकच्या हॉकी क्षेत्राचे भवितव्यही गटांगळ्या खात असल्याचे या निर्णयामुळे सिध्द झाले आहे. रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार या नामुष्कीजनक कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पाक संघाच्या सर्वच्या सर्व 18 खेळाडूंनी आपले राजीनामे पाक हॉकी महासंघाला पाठवले आहेत. आम्ही सपशेल अपयशी ठरलो. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन आम्ही राजीनामे देत आहोत. त्यामुळे युवा हॉकीपटूंचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ खेळाडू रेहान बट्ट व हसन यांनी व्यक्त केली.
निवड समिती व संघ व्यवस्थापन बरखास्त करणारे पाकचे माजी ऑलिम्पियन कासिम झिया यांनी लवकरच नवी निवड समिती अस्तित्वात येईल, असे सांगितले.