|
|
|
अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन कॅ. सावंत यांचे निधन
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 01:00 AM (IST)
सातारा, दि. 11 : लिंब गावचे सुपुत्र आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कॅप्टन दिनकरराव श्रीपती सावंत यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 1 ऑगस्ट 1924 रोजी शेतकरी कुटुंबात कॅ. सावंत यांचा जन्म झाला. त्यांचे सातवी पर्यंत शिक्षण झाले. त्यांना समाजकार्याची आवड होती. त्यांनी शेती, सहकार व सामाजिक कार्यात भाग घेतला. मृदूभाषी, स्वावलंबी, नि:स्वार्थी, कणखर मन, उत्तम शरीरयष्टी व गांधीवादी तत्वं त्यांनी बाळगली. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. कॉंग्रेस सेवादलाचे ते जिल्हा संघटक होते. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सायकलवरून प्रवास केलेल्या मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे ते अनुयायी होते. स्वातंत्र्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी भाग घेतला. लिंब गावचे सरपंच म्हणून त्यांची 3 वेळा बिनविरोध निवड झाली. ते 20 वर्षे सरपंच होते. पंचायत मंडळाच्या लोकल बोर्डावर त्यांची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. 1930 मध्ये पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. लिंब गावात मराठी शाळेचे बांधकाम त्यांच्याच पुढाकाराने झाले. छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांचे ते अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी होते. अजिंक्यतारा कारखान्याच्या उभारणीत त्यांनी भाऊसाहेब महाराजांना मोलाची साथ दिली. 1994 ते 1999 पर्यंत त्यांनी कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले. सध्या ते चेअरमन म्हणून काम पहात होते. गुरूवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी लिंब येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
फोटो गॅलरी
|