देऊर येथील जैन मंदिरातून 35 हजाराचा ऐवज लंपास
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:24 AM (IST)
सातारा, दि. 11 ः देऊर, ता. कोरेगाव येथील जैन मंदिरातून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील असलेल्या पितळी मूर्ती व पितळी दिवा असा एकूण 35 हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती वाठार स्टेशन पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देऊर येथे पुरातन काळातील पार्श्वनाथाचे जैन मंदिर आहे. मध्यरात्री 10 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाची कुलपे तोडून मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश करून मंदिरात असणाऱ्या लहान-मोठ्या अशा एकूण 6 मूर्ती तसेच पितळी दिवा व मंदिरात असलेली दानपेटी लंपास केली. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले; परंतु श्वानपथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.
दरम्यान, मंदिरात चोरीला गेलेली दानपेटी देऊर गावाच्या बाहेरील तळहिरा ओढ्याच्या कडेला मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पो. नि. राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. अरुण बोबडे करत आहेत.