|
|
|
राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता शिबिराची तयारी पूर्ण
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:23 AM (IST)
वाई, दि. 11 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुक्रवारी वाई येथे होणाऱ्या शिबिराची तयारी पूर्ण झाली असून हे शिबिर ऐतिहासिक होण्यासाठी आ. मकरंद पाटील प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात अशा पध्दतीची पाच शिबिरे होणार असून पहिले पश्चिम महाराष्ट्रातील एकदिवसीय शिबिर माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी वाई (सातारा) येथील वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे. सदर परिसराचे यशवंतराव चव्हाणनगर असे नामकरणकरण्यात आले आहे. सदर शिबिर शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार असून शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आ. मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पाच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री महोदय, आजी-माजी खासदार, आमदार व सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिबिरात ना. आर. आर. पाटील, ना. अजित पवार, ना. जयंत पाटील, ना. हसन मुश्रीफ, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, ना. बाबासाहेब कुपेकर, खा. सौ. सुप्रिया सुळे, श्रीमती निवेदिता माने, श्रीनिवास पाटील, आ. सौ. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी वक्त्यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. शिबिरासाठी 270 फूट लांब व 100 फूट रुंद असा 27 हजार स्के. फुटाचा भव्य मंडप उभारला आहे. सदर मंडपाचे काम सहकारनगर पुणे येथील बी. एस. कातुरे यांनी केले आहे. या मंडपात सुमारे 7 ते 8 हजार कार्यकर्त्यांची खुर्चीची बैठक व्यवस्था केली आहे. याशिवाय 10 हजार चौ. फूट व 7 हजार 200 चौ. फुटांचे दोन भव्य मंडप भोजनासाठी उभारले आहेत. सदरचे काम वाईतील हगवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर यांनी केले आहे. शिबिरातील बैठकीसाठी व भोजनासाठी स्त्रिया व पुरूष यांची स्वतंत्र वेगळी सोय केली आहे. बाजार समितीच्या प्रांगणात दहा मोबाईल शौचालयांची सोय करण्यात आली आहे. आ. मकरंद पाटील यांनी वाईत आयोजित केलेले शिबिर व त्याचे नियोजन हे उत्तम केले असून ते राज्यात होणाऱ्या इतर शिबिरांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व या शिबिराचे महासमन्वयक वसंत वाणी, राज्याचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले. शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे, जि. प. अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, सुधीर धुमाळ, ऍड. अरविंद चव्हाण, दिलीप पिसाळ, विजय नायकवडी, महादेव मसकर, मोहन जाधव, प्रमोद शिंदे, सौ. रंजना चव्हाण, सौ. नीलिमा खरात, प्रसाद सुर्वे, शशिकांत पवार, अशोक शिंदे आदी तालुक्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत. सदरचे शिबिर राज्यात प्रथम क्रमांकाचे होऊन ते इतरांना मार्गदर्शक ठरावे अशा पध्दतीचे नियोजन आ. मकरंद पाटील यांनी केले आहे.
फोटो गॅलरी
|