Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एकसळ येथे उसाच्या फडाला आग; दीड वर्षाची बालिका सुदैवाने वाचली
- वसंत केशव पाटील
Friday, March 12, 2010 AT 12:56 AM (IST)
Tags: regional
कोरेगाव, दि. 11 : एकसळ, ता. कोरेगाव येथील शेतकरी राजाराम चिंतू माने यांच्या शेतात  उसाची तोड सुरु असताना गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आणि फडात उभी असलेली बैलगाडी जळाली. बैलगाडी खाली झोपलेल्या दीड वर्षाच्या मुलीस मुकादम आणि ऊसतोड करणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान राखत वाचविले. या आगीत 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एकसळ येथील शेतकरी राजाराम माने यांचा मळा नावाच्या शिवारात 33 गुंठे क्षेत्रावर ऊस उभा होता. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या दहा दिवसांपासून लाला मुकादम  यांची टोळी ऊसतोड करत होती. कारखान्यापासून हे क्षेत्र जवळ असल्याने चार बैलगाड्यांच्या माध्यमातून उसाची वाहतूक केली जात आहे. गेल्या आठ दिवसात 80 टक्के ऊस तुटला असून गुरुवारी सकाळपासून उसाची तोड सुरु झाली होती. कारखान्याचा स्लीपबॉय विकास यादव हा नवीन फडाची स्लीप तयार करत नजिक झाडाखाली सावलीत बसला होता. स्लीप आणण्यासाठी मुकादम व गाडीवान स्लीपबॉयकडे गेले होते. तर महिला  पाणी पिण्यासाठी शेजारी झाडाखाली बसल्या होत्या. त्यापैकी जिजाबाई पांडुरंग जाधव या मोळीला भर घालण्यासाठी एकट्याच ऊस तोडत होत्या. ऊस मोळीत टाकत असताना बैलगाडी खाली झोपवलेल्या सुप्रिया राजाराम खरमारे ही दीड वर्षांची मुलगी अचानक जोरजोरात रडू लागली. सुप्रिया का रडतेय याकडे जिजाबाईचे लक्ष गेले, त्यावेळी बैलगाडी शेजारी आग लागल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर आग... आग म्हणून जिजाबाईंने आरडाओरड केला. स्लीपबॉयजवळ बसलेले मुकादम व ऊसतोड कामगार पळतच शेतात आले. त्यांनी बैलगाडीखाली असलेली मुलगी लाला मुकादम याने पटकन बाहेर काढली आणि कोयत्याने दोर तोडत बैलांना सोडविले आणि शेताच्या बाहेर काढले. त्यानंतर तिन्ही बैलगाड्या ओढून बाहेर काढल्या. एक बैलगाडी मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, दोन्ही टायर आणि वायररोप जळून गेले. बघता बघता संपूर्ण फडाला आग लागली. या आगीत उर्वरित ऊस संपूर्ण जळून खाक झाला. टोळीतील कामगारांचे कपडे, जीवनावश्यक साहित्य, जेवणाचे साहित्य जळाले.
शेतकरी माने व स्लीपबॉय यादव यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि कारखान्याला आगीची माहिती दिली. मुख्य अधिकारी मगदूम यांनी शेती अधिकारी एन. के. पाटील, गट अधिकारी बाळासाहेब क्षीरसागर यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. गावकामगार तलाठी चव्हाण व पोलीस पाटील अशोक भोसले यांनी पंचनामा केला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: