साखर संघाच्या समित्या जाहीर मदन भोसले, शंभूराज देसाई, ऍड. पाटील, संजीवराजे, श्रीमती सुनेत्रा शिंदे यांची वर्णी
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:55 AM (IST)
उंडाळे, दि. 12 : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सन 2010 च्या कार्यकारी मंडळ व अन्य समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच संघाच्यावतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. या समित्यांवर सातारा जिल्ह्यातील माजी आ. मदन भोसले, शंभूराज देसाई, ऍड. उदयसिंह पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमती सुनेत्रा शिंदे यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या महत्वपूर्ण बैठकीत सन 2010 साठीचे कार्यकारी मंडळ व विविध उपसमितीच्या निवडी करण्यात आल्या. साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले-पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, माजी अध्यक्ष आ. बाळासाहेब पाटील हे तिघे सर्व समित्यांवर पदसिद्ध सदस्य आहेत. कार्यकारी मंडळ व पाच उपसमित्यांवर राज्यातील साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना स्थान दिले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 9 सहकारी साखर कारखान्यांपैकी 7 साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना स्थान मिळाले आहे.
कार्यकारी मंडळात किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले व बाळासाहेब देसाई
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शंभूराज देसाई यांना स्थान दिले गेले आहे. महत्वपूर्ण अशा खरेदी उपसमितीवर रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. उदयसिंह पाटील, नवीन कारखाने समितीवर प्रतापगड साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा शिंदे, मजूर कामगार व्यवस्थापन समितीवर मदन भोसले, आजारी कारखाने समितीवर श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना स्थान दिले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले-पाटील, ना. अजित पवार, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, ना. पतंगराव कदम, आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.