Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी योजनांसाठी संघटित ताकद निर्माण व्हावी : ना. रामराजे
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 11:05 PM (IST)
म्हसवड, दि. 13 : पश्चिम महाराष्ट्रातील पाणी योजनांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या आमदार, खासदार व नेते मंडळींनी एकत्रित येऊन संघटित व्हावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
राणंद, ता. माण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन ना. नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, संपतराव अवघडे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे, अर्जुन खाडे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या छायादेवी चोपडे, राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, सरपंच सौ. कांताताई जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, माण विधानसभा निवडणुकीनंतर आंधळी जिल्हा परिषद गटाची जागा रिकामी झाली आहे. या गटाच्या निवडणुकीस मोठ्या ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीमधून उभा करुन ही निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंध करण्याची जबाबदारी महत्वाची राहणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमेकांवर न फोडता झाले गेले विसरुन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी कशी भरारी घेईल, याबाबत मी स्वत: लक्ष घालणार आहे. माणचा पाणी प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच सोडवू शकतो. माढा मतदारसंघात माणचा समावेश झाल्याने या मतदारसंघाचे खा. कृषिमंत्री शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष दिले आहे. येथील कामेही सुरू झाली आहेत. पण, येथील पाणी प्रश्नावर सर्वांचीच एकजूट महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
आ. शिंदे म्हणाले, माण तालुक्यात गावोगावी विकासकामे पोहचवण्याचे काम सदाशिवराव पोळ यांनी केले. पण, गेली 40 वर्षे विकासकामे करणाऱ्यास मतदारांनी नाकारले व कोणतेही काम न करणाऱ्याला विजयी केले. याची कारणमीमांसा केली तर अंतर्गत गटबाजीमुळे शत्रू मजबूत करण्याचे काम येथे झाले आहे. पण, हे योग्य नाही आणि म्हणूनच यापुढे होणाऱ्या निवडणुकीत या तालुक्यात मी स्वत: जिल्हाध्यक्ष या नात्याने लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोळ म्हणाले, माणमध्ये गुंडगिरीचे काम सुरू झाले आहे. नुकत्याच झालेल्या वाळू लिलावाच्यावेळी दहशतीने जवळची माणसे हाकलून लावण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे त्यांचे खरे रुप जनतेच्यासमोर आले आहे. एकाच पक्षात दोन गट व समान पार्ट्या असे राजकारणात चालत नाही. या प्रवृत्तीमुळे माणमध्ये राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आ. शिंदे यांनी लक्ष घालावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळासाहेब जगदाळे, ऍड. भास्करराव गुंडगे यांची भाषणे झाली.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: