Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मायणी परिसरात झटपट श्रीमंतीचे फॅड
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:41 AM (IST)
Tags: regional
मायणी, दि. 12 ः कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा अनेकांची असते. त्यासाठी नाना तऱ्हेचे  अनेकजण प्रयत्नही करत असतात; पण यश मात्र मिळत नाही. हल्ली ग्रामीण भागात कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी घुबड, कासव, काळे मांजर, म्हांडुळ यातील प्रत्येकी एका वस्तूला 3।। लाख रुपये मिळतात, अशी अफवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरल्याचे दिसून येत आहे. घुबड, कासव, काळेमांजर, म्हांडुळ या सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या वस्तू आहेत; परंतु यापैकी कोणतीही एक वस्तू मांत्रिकाकडे दिल्यावर मांत्रिक त्या वस्तूवर मंत्राची जादू करून पैशाचा पाऊस पाडतो, अशी चर्चा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. त्यामुळे या वस्तू मिळवण्यासाठी अनेकजण आपले रोजचे काम सोडून या वस्तूंच्या शोधासाठी घराबाहेर पडत आहेत. या वस्तू घेण्यामागे काही अटीही आहेत त्या म्हणजे घुबड, कासव, काळेमांजर, म्हांडुळ यांचे प्रत्येकी 3।। किलो वजन असावे, या वस्तूंचा लोखंडाला स्पर्श होता कामा नये, कासवाला 21 नख्या असाव्यात, म्हांडुळ दोन तोंडाचे असावे व त्याची दोन्ही तोंडे सुरू असायला हवीत. मांजर पूर्ण काळे असावे.
सध्या या वस्तूंच्या शोधासाठी तरुणवर्ग चांगलाच गुंतला आहे. या वस्तूपैकी एखादी वस्तू सापडलीच तर सर्वांना आनंद होतोच; पण वस्तूंचे अपेक्षित वजन न भरल्यास दुःखही तेवढेच होते. प्रत्येकी एका वस्तूसाठी 3।। लाख रुपये देण्याची तयारी पर जिल्ह्यातील लोक दाखवित आहेत.
या वस्तू मांत्रिकाकडे नेहल्यावर गुप्तधन मिळवण्यासाठी या वस्तूवर मांत्रिकाकडून विधी केला जातो. विधी केल्यानंतर अर्ध्या तासानंतर या वस्तू एका विशिष्ट प्रकारचा आवाज करतात आणि जोपर्यंत तो आवाज सुरू आहे तोपर्यंत पैशाचा पाऊस पडतो, अशी माहिती समोर आली आहे. पाडलेल्या पैशाचा काही हिस्सा मांत्रिकाला दिला जातो व उरलेल्या जो वस्तू देईल त्याला दिला जातो. अशाप्रकारच्या अंधश्रद्धेला या परिसरातील तरूणवर्ग पडला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: