शाहू ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घडवले कलाविष्काराचे प्रदर्शन
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:42 AM (IST)
सातारा, दि. 12 ः टाकाऊ वस्तूपासून आकर्षक अशा टिकाऊ वस्तू कागदी लगद्यांपासून पशु-पक्षी याबरोबरच मनाला भुरळ पाडणाऱ्या वस्तूंचे कलाप्रदर्शन भरवून विसावा नाका येथील छ. शाहू ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुप्त कलाविष्कारांचे जणू प्रदर्शनच घडवले.
विसावा नाका परिसरातील छ. शाहू ऍकॅडमी ही इंग्रजी माध्यमाची शाळा आपल्या विविध उपक्रमाच्यामाध्यमातून लक्षवेधी आणि एक आदर्श शाळा ठरली आहे. शाळेच्या संस्थापक, प्राचार्या श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या शाळेने दत्तक झाड योजना, पर्यावरण संतुलन, प्लॅस्टिक निर्मूलन आदी विधायक उपक्रम राबवण्याबरोबरच स्पर्धा परीक्षा व क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
कार्यानुभवाच्या माध्यमातून तसेच हस्तकलेतून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच शाळेच्या कलादालनात भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात कागदापासून, मातीपासून तसेच टाकावू वस्तूंपासून पशु-पक्षी, आकर्षक वस्तू मांडण्यात आल्या होत्या. प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून प्रकल्प तयार करून अनेक प्रकल्पांचे सादरीकरणही उत्तमरित्याकेले होते.