स्त्री भ्रूणहत्या टाळा : सौ. शिंदे
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:57 PM (IST)
तरडगाव, दि. 13 : स्त्री ही एक शक्ती आहे तथापि ही शक्ती अनेक कारणांनी दडपली जाते. काहीवेळा तिला जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप घ्यावा लागतो. प्रत्येक स्त्रीला कधीतरी आपल्याला एकतरी मुलगी हवी असे वाटते याची आठवण करुन देवून स्त्री भ्रूणहत्या टाळा, मुलगा-मुलगी भेद भाव मानू नका, असा संदेश सरपंच सौ. कावेरीताई शिंदे
यांनी दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त येथील प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात पहिल्या महिला सरपंच सौ. कावेरीताई शिंदे अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी ग्रामशिक्षण समितीच्या सदस्या सौ. सुनीता घाडगे, संजय किकले, मुख्याध्यापक सतीश पंडीत गुरुजी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. केवळ चूल आणि मूल हेच स्त्रीचे क्षेत्र नसून तिने राजकारण, क्रीडा, संगीत, चित्रपट, नृत्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला असून आजच्या संगणक युगात आपण कोठे कमी पडतो का याचा अभ्यास करुन महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर मुलांवर चांगले संस्कार करुन त्यांना घडविले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन त्यांना उत्तम ज्ञान दिले पाहिजे, अशी अपेक्षा सौ. शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी श्रीमती धुमाळ, श्रीमती शिनगारे, श्रीमती चिरमे यांची भाषणे झाली. सौ. मुळे यांनी आभार मानले.