Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मधुकरराव चौधरी यांना यशवंत भूषण पुरस्कार जाहीर
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:53 AM (IST)
Tags: regional
कराड, दि. 12 : शिक्षण मंडळाच्यावतीने 2009-10 चा यशवंत भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व विधानसभेचे माजी सभापती मधुकरराव चौधरी यांना देण्याची घोषणा शिक्षण मंडळाचे चेअरमन मुकुंदराव कुलकर्णी यांनी केली. येथील महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. श्रीनिवास पाटील होते. यावेळी कर्नल संभाजीराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, मंडळाचे सचिव डॉ. रा. गो. प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलकर्णी म्हणाले, यशवंत भूषण पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून पहिला पुरस्कार स्व. पी. डी. पाटील यांना तर दुसरा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना देण्यात आला होता. रोख 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघातर्फे आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या वैद्य मिलिंद पेंढारकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, वैद्य श्रीपाद कुलकर्णी व उद्योग क्षेत्रातील विनायक विभुते यांचा सत्कार करण्यात आला. विक्रम पावस्कर यांनी माजी विद्यार्थी संघास 22 हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रभुणे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणपतराव कणसे यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेताना भविष्यात संघाच्यावतीने भव्य सभागृह बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. मुकुंदराव कुलकर्णी यांनी स्वागत केले. रत्नाकर शानभाग यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: