Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

लोकशाहीचा खून
ऐक्य समूह
Thursday, July 22, 2010 AT 11:51 PM (IST)
Tags: editorial,  

लोकशाहीच्या रक्षकांनीच लोकशाहीचा पवित्र मंदिरात बिहारच्या विधानसभेत राजरोसपणे दिवसाढवळ्या खून केला.   मंदिराचे पुजारीच असे ठग, पेंढारी आणि गारदी झाल्यावर, त्या देवतेचे पावित्र्य राहणार तरी कसे? मंगळवारी आणि बुधवारी बिहारच्या विधानसभेत जे काही घडले, ते अत्यंत संतापजनक आणि लोकशाहीच्या परंपरेला डांबर फासणारे आहे. विधानसभा हे जनतेच्या समस्यांची चर्चेच्या मार्गांनी सोडवणूक करायचे हक्काचे व्यासपीठ! पण गेल्या काही वर्षात मात्र लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या आमदारांना आपण लोकांसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत, याचे भान राहिलेले नाही. लोकसभा आणि राज्या-राज्यांच्या विधानसभांचे कामकाज गाजते ते, आमदारांनी घातलेल्या गोंधळ, दंगा आणि हाणामाऱ्यांनीच! बिहारच्या विधानसभेत मात्र या साऱ्या काळ्या परंपरेचाही कळस झाला.  सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहाचा थेट आखाडाच केला. परस्परांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि एकमेकांवर चिखलफेक करता करता, या दोन्ही गारद्यांच्या टोळ्या आक्रमक झाल्या. बघता बघता बिहारच्या विधानसभेला रणांगणाचे रुप आले. दोन्ही टोळ्यातल्या गारद्यांनी परस्परांच्या मानगुटी धरल्या. हाणामारीची धुमश्चक्री सुरु झाली. सभागृहातल्या खुर्च्या आणि टेबलांची फेकाफेक झाली. ध्वनीक्षेपक हातबॉंबसारखे हवेत फिरवून मारले गेले. सभापतींच्या समोरचे टेबल सत्ताधारी आघाडीच्या आमदारांनी   उचलून फेकले आणि त्याखाली विरोधी पक्षांच्या आमदारांना चेंगरायचाही प्रयत्न केला. सभागृहातील कोणतीही वस्तू फेकायसाठी शिल्लक राहिली नाही. प्रचंड गोंधळ, नासधूस, फेकाफेक, शिवीगाळ, आरडाओरडा आणि धमक्या असा हा अभूतपूर्व राडा आमदारांनी पंधरा मिनिटे केला. रस्त्यावरचा राडा पोलिसांना आवरता येतो. राडा करणाऱ्या गुंडांना पकडता येते. पण सभागृहात मात्र पोलिसांचे काही चालत नाही. कारण आमदारांना घटनेनेच विशेष अधिकार दिले आहेत. आपल्याला सभागृहातही धिंगाणा आणि हैदोस घालायचा अधिकारही मिळाल्याच्या अविर्भावात हे सारे आमदार हाणामाऱ्या करीत होते. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा, धृ्रतराष्ट्राच्या राजदरबाराचे सारे योध्दे खाली माना घालून बसले होते, तशीच अवस्था विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांची झाली होती. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीतच हा सारा राडा झाला. सत्ताधारी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनीही आपल्या सदस्यांना आवरले नाही, हा सारा दंगा ते शांतपणे पाहत राहिले. काही मंत्रीही या हाणामारीत, गुंडागर्दीत आवेशाने सामील झालेले होते. खजाना चोर, गद्दी चोर, नितीश-मोदी हाय-हाय, यह देखो कॉंग्रेस का खेल, खा गए चिनी, पी गए तेल, जो सरकार महंगाई रोक न रोके वह सरकार निकम्मी है। अशी परस्परांच्या विरोधी-गगनभेदी घोषणाबाजीही सुरुच होती. एकमेकांवर तुटून पडलेल्या या आमदारांना नियंत्रणात आणायसाठी शेवटी चौधरी यांनी मार्शल्सना बोलावले. पण या दंगेखोर आमदारांनी त्यांच्याबरोबरही दंगा मस्ती केली. हाणामाऱ्या करणाऱ्या आमदारांना बाहेर नेताना त्यांनी मार्शल्सना लाथा झाडल्या. रस्त्यावर लोळण घेतली. आमदारांचा हा पराक्रम पाहून त्या दिवशी भारतीय लोकशाहीच्या देवतेने शरमेने खाली मान घातली असेल. या बेशरम आणि निर्लज्ज आमदारांना आपण जे काही केले, त्यात वावगे असे काही वाटत नाही, ही बाब संतापजनक ठरते. अध्यक्षांनी निलंबित केलेल्या आमदारांनी, आपल्यावरची ही कारवाई म्हणजे, लोकशाहीचा खून असल्याचे सांगत छाती बडवून घ्याव्यात, हे अति झाले. सैतानाने बायबल सांगायचा हा प्रकार झाला. सभागृहात जे काही घडले, ते बिहार आणि देशातल्या जनतेने उपग्रह वृत्त वाहिन्यांवरच्या प्रक्षेपणात पाहिलेच आहे. बिहारच्या जनतेला आपण अशा गुंड आणि मवाली बदमाशांना निवडून दिल्याचा नक्कीच पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
लोकशाही संकेतांची होळी
भारताच्या महालेखापालांनी बिहारच्या आर्थिक व्यवहाराबाबत काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे पाटणा उच्च न्यायालयाने, एकूण साडेअकरा हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करायचा आदेश अलिकडेच सीबीआयला दिले. त्याचे राजकीय भांडवल करुन, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारला बदनाम करायसाठी विरोधकांना पेटते चूड हाती मिळाले. सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरु होताच, विरोधी पक्षाच्या आमदारांनी, नितीशकुमार सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत गोंधळाला सुरुवात केली. काहीही झाले तरी सभागृहात कोणतेही कामकाज होऊच द्यायचे नाही, असा निर्धार करुनच हे आमदार सभागृहात आले होते. त्यांच्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्षांनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. सोमवारी रात्री विरोधी पक्षाचे आमदार विधानसभेतच तळ ठोकून राहिले. मंगळवारी पुन्हा त्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यावर तिसऱ्यांदा ते सुरु  होताच, जोरदार दंगा केला. बुधवारी सभागृहात राडा केला. विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पक्ष, कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्षांसह 16 आमदारांचे सदस्यत्व निलंबित केल्यावर, पुन्हा जोरदार हाणामाऱ्या झाल्या. हाताला येईल ते फेकून मारायचे सत्र सुरु झाले. हाणामाऱ्या आणि दंग्याच्या या गोंधळातच बुधवारीही पुन्हा हाणामाऱ्या झाल्या. विधानसभेच्या अध्यक्षावरच एका आमदाराने चप्पल फेकून मारली. सहनशीलतेचा अंत झाल्यामुळेच अध्यक्षांनी आणखी 53 आमदारांचे सदस्यत्व निलंबित केले. तेव्हा अध्यक्षांनाही शिवीगाळ झाली. मार्शल्सनी सक्तीने या निलंबित आमदारांना सभागृहाबाहेर उचलून नेल्यावर, विधानभवनाच्या आवारातही या आमदारांनी राडा केला. पत्रकार आणि दूरदर्शन वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकारांना बुधवारी विधानभवनात प्रवेश दिला गेला नाही, तो आमदारांनी घातलेला तमाशा जनतेला पहायला मिळू नये, याच उद्देशाने! पण सभागृहात हाणामारीत सामील झालेल्या महिला आमदारांनी सभागृहाबाहेर हाकलून काढल्यावर,  प्रचंड दंगा केला, गोंधळ घातला. कॉंग्रेसच्या आमदार ज्योती कुमार यांनी तर प्रचंड धिंगाणा घातला. विधानभवनाच्या प्रवेशद्वारातील फुलांच्या सर्व कुंड्यांची त्यांनी फेकाफेक केली. काही कुंड्या सुरक्षा रक्षकांना आणि पत्रकारांनाही फेकून मारल्या. त्यांचा हा तमाशा सुरु असतानाच, विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधान भवनाबाहेर नितीशकुमारांचा पुतळा जाळून, त्यांच्या नावाने शिमगा केला. या गुंड आमदारांच्या हाणामाऱ्यांनी बिहारची जनताही थक्क झाली, शरमली. पण, लोकशाहीचा मुडदा पाडणारे हे आमदार मात्र, शूराच्या आवेशात निर्लज्जपणे आपल्या कृत्याचे समर्थन करीत आहेतच! बिहार विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्यामुळेच, सरकारला बदनाम करायसाठी सरसावलेल्या या विरोधकांनी लोकशाहीच्या देवतेचीही अशी विटंबना केली, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव होय!

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: