पावसामुळे भाज्यांचे दर उतरले
aikya group
Friday, July 30, 2010 AT 02:05 AM (IST)
सातारा, दि. 29 : मेथीची पेंडी 2 रुपये, पालक 5 रुपयांना दोन पेंड्या, कोथिंबीर पेंडी 1 रुपया, वांगी 20 रुपये किलो असा निम्म्याहून कमी दरात भाजीपाला असून मुसळधार पाऊस आणि बाजारात पालेभाजी, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली आवक यामुळे भाजीपाल्यांचे दर उतरले आहेत. जवळजवळ निम्म्याहून कमी दर झाल्याने आता सर्वसामान्यांना भाजी घेणे परवडणार असल्याने भरपावसातही मंडईत गर्दी होताना दिसत आहे.
आठवड्यापूर्वी 12 रुपयांना मेथीची एक पेंडी तर वांगीही जवळजवळ 50 रुपये किलो दराने बाजारात विक्रीस होती. कोथिंबीरीच्या चार काड्या 5 रुपयांशिवाय मिळत नव्हत्या त्यामुळे 10 ते 12 रुपयांना मिळणाऱ्या हिरव्या भाज्या सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार झाल्या होत्या. सर्व ऋतूत सहज उपलब्ध असणारी फळभाजीही 50 रुपयांच्या घरात गेल्याने वांगीही सर्वसामान्यांना कडू लागायला लागली. भाज्यांच्या दरात दिवसेंदिवस भर पडत असल्याने सर्वसामान्यांनी भाजी मंडईकडे पाठ फिरविली होती. शेतकऱ्यांना अशा दरात भाजी विकणे परवडत होते मात्र होलसेल भाजी घेवून पुन्हा
त्याची विक्री करणे भाजी विक्रेत्यांना परवडत नव्हते.
त्यामुळे खरेदी करणारांबरोबरच तेही मेटाकुटीला आले होते. भाजीच्या दरात वाढ झाल्याने मंडईतही नागरीक फिरकेनासे
झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच तेही पावसाची वाट
पहात होते. सर्वसाधारण पावसाळ्यात भाज्यांचे दर कमी होतातच. भाज्या लवकर खराब होत असल्याने ढिगाने
आणून त्या भराभर खपवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न
दिसतो. तर भाज्याची आवक जास्त प्रमाणात होत असल्यानेही दर कमी होतो.