Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्याला दोन मंत्रिपदे हवीच
aikya group
Friday, July 30, 2010 AT 02:28 AM (IST)
Tags: main news

सातारा, दि. 29 : फलटणची जबाबदारी आ. दीपक चव्हाण व सहकाऱ्यांकडे सोपवून रामराजे तुम्ही आता जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या. कारण जिल्ह्याने कायम राष्ट्रवादीला साथ दिली आहे. आठपैकी सहा आमदार राष्ट्रवादीचे आहेत. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंकही आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे जिल्ह्याला एक नव्हे दोन मंत्रिपदे दिली पाहिजेत. त्यासाठी पक्षाध्यक्ष पवारसाहेबांकडे आग्रह धरण्याची गरज असून हे कामही रामराजे तुम्हालाच करावे लागेल. कारण तुमच्याइतका विश्वास अन्य कोणावरही पवारसाहेबांनी ठेवला नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदामंत्री ना. अजित पवार यांनी रामराजेंवर कौतुकाचा वर्षाव केला आणि जिल्ह्याचे नेतृत्व पूर्णक्षमतेनेकरण्यासाठी मतदारसंघ सोडून निर्णय घेण्याचे अधिकारही सूचक शब्दात त्यांना दिले. दरम्यान, लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत वा विधानपरिषदेवर कोठेही पाठवा पण दादा आम्हाला तुमच्या सोबत ठेवा, असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही यापुढे अजितदादांसोबतच काम करण्याची स्पष्ट भूमिका जाहीर केली.
ना.अजित पवार यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आणि विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल  आ. विनायक मेटे, आ. प्रकाश बिनसाळे तसेच जलसंपदा व जिल्ह्याच्या  पालकमंत्रिपदी फेरनिवड झाल्याबद्दल श्रीमंत रामराजे यांचा नागरी सत्कार येथील मुधोजी क्लब मैदानावर उभारलेल्या भव्य शामियान्यात  झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे होते.
 यावर्षीच्या अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा पाटबंधाऱ्यासाठी जवळपास 700 कोटी रुपये अधिक उपलब्ध झाले असून त्यापैकी 170 कोटी कृष्णा खोऱ्यासाठी प्राप्त झाले आहेत.  आगामी हिवाळी अधिवेशनात पाटबंधाऱ्यासाठी अधिक आर्थिक तरतुदी करुन घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ना. पवार यांनी स्पष्ट केले.
कृष्णा-भीमा जलस्थैर्यीकरण प्रकल्पाचे कामही सुरु करण्याचा प्रयत्न असून सोमंथळी, उध्दट, आसू येथे नीरा नदीत बॅरेज उभारुन या कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याद्वारे बारामती, फलटण, इंदापूरला पाणी उपलब्ध होणार असल्याची ग्वाही यावेळी अजितदादांनी दिली.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने खंडाळा व फलटण तालुक्यात उभ्या राहत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी  ना. श्रीमंत रामराजे,आ. मकरंद पाटील यांनी पुढाकार घेवून येथे पॉलिटेक्निक उभारुन योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये उभ्या राहिलेल्या विविध कारखान्यांमध्ये आपल्या तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी या कारखान्यांना आवश्यक असलेले व्यवसाय शिक्षण देण्याची सुविधा विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याने  तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या. येथे 1200 कोटी रुपये गुंतवणुकीचा कमिन्स प्रकल्प उभा राहत आहे. अन्य प्रकल्पही उभे राहतील.
खंडाळा तालुक्यात तर मोठी औद्योगिक निर्मिती होत असताना तेथे अन्य ठिकाणांवरील तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याअगोदर आपल्या तालुक्यातील तरुणांना या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्या अन्यथा विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची सुविधा आम्ही उपलब्ध करुन देवू मात्र कोणत्याही परिस्थितीत या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी सहकारी सूतगिरण्या उभ्या राहिल्या, मात्र पुढे त्या कार्यान्वित झाल्या नाहीत. राज्य शासनाने या सर्व सूतगिरण्या कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार आहे. सातारा, वाई, खंडाळा भागातील सूतगिरण्या सुरु करण्यासाठी शासनाच्या या धोरणाचा उपयोग करुन घ्यावा. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी (को जनरेशन) सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढे आले पाहिजे. केंद्र व राज्य शासन या सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी अनेक सवलती देत असून त्यासाठी राज्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होवू शकतो.  सहकारी साखर कारखान्यांना वीज वितरण कंपनी वीज खरेदी करताना चांगला दर देत असल्याने वर्षाकाठी 7/8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. साखर कारखान्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. शासनाचे धोरण वीजनिर्मितीला प्राधान्य देण्याचे असल्याने साखर कारखाना खाजगी असो वा सहकारी सर्वांनाच या संधी उपलब्ध होणार असल्याचे ना. अजितदादा पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
साखरवाडीचा न्यू फलटण शुगर वर्क्स आर्थिक गर्तेतून बाहेर पडून उभारी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारखान्यानेही को- जनरेशनसाठी पुढे यावे, त्यांनाही निश्चित मदत केली जाईल. शेतकऱ्याला मदत करण्याचे, शेतमालाला जास्तीत जास्त दर देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारचे असल्याने ज्या कामामध्ये जो सकारात्मक भूमिका घेईल, त्याला सहाय्य करण्याची  आमची भूमिका असल्याचे ना. पवार यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने सूर्य किरणाद्वारे वीज निर्मितीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून प्रामुख्याने पडिक माळाच्या क्षेत्रावर सोलर प्रोजेक्ट उभारुन त्या माध्यमातूनही वीजनिर्मिती करण्याचा विचार आहे. ज्या जिल्ह्यात वीजनिर्मिती होते, त्या जिल्ह्यांना भारनियमनातून वगळण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी ना. पवार यांनी स्पष्ट केले.
शेतीला जोडधंदा म्हणून सुरु करण्यात आलेला दुग्ध व्यवसाय निश्चितपणे चांगल्या पध्दतीने सुरु आहे. पुणे, सोलापूर, नगर व इतर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय ज्या प्रमाणात वाढला त्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात वाढला नसला तरी फलटण तालुक्यात मात्र दुग्ध व्यवसाय चांगल्या पध्दतीने वाढल्याबद्दल समाधान वाटते.  दूध उत्पादकांनी कोणत्याही प्रकारे दुधात भेसळ करण्याचा मोह टाळावा आणि दर्जेदार दूध उत्पादन करुन चांगले पैसे मिळवावेत, असे आवाहन त्यांनी केले. भेसळीच्या दुधाला कडक शासन करण्याचा कायदा लवकरच येत असून त्यापासून बचावासाठी आतापासून दूध भेसळीपासून दूर राहिले पाहिजे. या व्यवसायाच्या वाढीसाठी केंद्रातून ना. पवारसाहेब आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपण स्वत:, रामराजे व आमचे अन्य सहकारी निश्चितपणाने सहाय्यभूत ठरतील, अशी ग्वाही ना. पवार यांनी दिली.
लोणंद, फलटण, बारामती रेल्वेमार्ग बागायती भागातून जाणार असेल तर त्याला आपला ठाम विरोध राहील. शिरवळ, लोणंद, फलटण, बारामती रस्त्याचे चौपदरीकरण सध्या सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असतानाच पुन्हा रेल्वेमार्गासाठी जमिनी संपादित करण्याने काही शेतकरी भूमीहिन होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर बागायती क्षेत्र संपादित करु देण्यास कोणी शेतकरी धजावणार नसल्याचे ना. पवार यांनी स्पष्ट केले तथापि जिरायती पट्‌ट्यातून रेल्वेमार्ग जाणार असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र त्याबाबत चर्चा करुन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन  ना. पवार यांनी यावेळी दिले.
कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्पासाठी आतापर्यंत अनुशेषाच्या अडचणीमुळे पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही. जवळपास 10 वर्षे हा अनुशेष भरुन काढण्यात गेली. आता मात्र या प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार असून या जिल्ह्यातील नीरा-देवघर, उरमोडीसारखी अपूर्ण धरणे व त्यांचे कालवे पूर्ण करण्याबरोबरच वसना-वांगणा, कवठे-केंजळ, जिहे-कठापूर या योजना टेंभू-ताकारीच्या उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार असल्याचे ना. अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
ना. श्रीमंत रामराजे यांना आमदारांनी निवडून दिले असल्याने येथील सर्वसामान्यांचा विचार करण्याची जबाबदारी आमदार दीपक चव्हाण व अन्य सहकाऱ्यांवर सोपवून आता रामराजे तुम्ही जिल्ह्याच्या विकासाकडे आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, जिल्ह्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करा. राज्यस्तरावर माझ्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री तुम्हाला निश्चित साथ करतील. हा जिल्हा नेहमी राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आठपैकी 6 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत येथे एक नव्हे दोन मंत्रिपदे दिली पाहिजेत. त्यासाठी पक्षाध्यक्ष पवारसाहेबांकडे आग्रह धरण्याची आवश्यकता असून हे कामही रामराजे तुम्हालाच करावे लागेल. कारण तुमच्याइतका विश्वास अन्य कोणावरही साहेबांनी ठेवला नाही. जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून संघटित ताकद निर्माण करुन चांगली शक्ती उभी केली आहे. त्याला दृष्ट लागेल असे कोणीही वागू नका, असे आवाहन यावेळी ना. अजित पवार यांनी केले. महाराष्ट्राने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यावर मोठा विश्वास ठेवला, तो त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरविला. दुसऱ्या पिढीनेही या नेत्यांसारखे वागून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. आपल्या वागण्या- बोलण्यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशा पध्दतीने काम केले पाहिजे. गट- तट, विचार मंच निर्माण करण्यापेक्षा पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या विविध सेलच्या माध्यमातून येथे पक्ष अधिक मजबूत करा. त्यातून अनेक मंत्रिपदे आणि सत्तेची साधने निश्चित प्राप्त होतील, अशी ग्वाही देवून सत्काराबद्दल ना. अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अपुरे प्रकल्प पूर्ण करणार
राजकारणातील पद किंवा सत्तेची आपल्याला बिलकूल महत्वाकांक्षा नाही. तथापि राज्याच्या वाट्याचे पाणी अन्यत्र जावू देणार नाही. कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्पाची उभारणी करुन कायम दुष्काळी पट्‌ट्यातील शेतीला हे पाणी मिळाले पाहिजे आणि औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतून कृषी, औद्योगिक समाजरचना यशस्वी झाली पाहिजे यासाठी आपल्याला सत्तेची संधी हवी होती. ना. शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने ती संधी आपल्याला प्राप्त करुन दिली. या सत्तेच्या माध्यमातून 31 मे 2000 नंतर महाराष्ट्राच्या वाट्याचा पाण्यावरील हक्क सोडावा लागणार होता. तो आपण अबाधित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत, पाणी धरणाआड अडवून ठेवले आहे. आता कालव्याची कामे पूर्ण करुन ते शिवारात आणण्यात आपण निश्चित यशस्वी होवू. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तालुक्या-तालुक्यात कारखाने उभे राहिले आहेत. आता  तरुणांना तेथे नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहेे. लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत वा विधानपरिषदेवर कोठेही पाठवा पण दादा आम्हाला तुमच्या सोबत ठेवा. सातारा जिल्ह्याचे  साहेबांवरील प्रेम कधीही कमी होणार नाही. सातारा जिल्ह्याची ही ताकद आणि प्रेम आपल्या पाठीशी निश्चितपणे राहील, याची ग्वाही देवून विधानपरिषद आणि मंत्रिपद  पुन्हा दिल्याबद्दल ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी हिंदूराव  नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश बिनसाळे यांची भाषणे झाली.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी उपस्थित मान्यवरांचे नगरपरिषदेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून  स्वागत केले. त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या हस्ते 51 व्या वाढदिवसानिमित्त ना. अजितदादा पवार यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ देवून हार घालून आणि चांदीची तलवार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला तर विधानपरिषदेवर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल आ. विनायक मेटे आणि आ. प्रकाश बिनसाळे यांचा तसेच विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आणि जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्रिमंडळात फेरसमावेश झाल्याबद्दल ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून फेटा बांधून, भेटवस्तू देवून ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विविध संस्था आणि व्यक्तींच्यावतीने ना. अजित पवार, ना. श्रीमंत रामराजे, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश बिनसाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी आमदार सदाशिवराव पोळ व दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा बॅंकेचे व्हाईस चेअरमन लालासाहेब शिंदे व त्यांचे सहकारी संचालक, न्यू फलटण शुगर वर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंखे (पाटील), डॉ. विजयराव बोरावके, सुभाषराव शिंदे, महादेवराव पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. भीमदेव बुरुंगले यांनी आभार मानले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: