Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 57
रामकृष्ण परमहंस यांची ही गोष्ट. रामकृष्ण परमहंस हे एके सकाळी नदीत स्नानाला गेले होते. स्नान करून सूर्याला अर्ध्य देण्यासाठी त्यांनी ओंजळत पाणी घेतले तेवढ्यातच त्या नदीत बुडत असणारा एक विंचू त्या पाण्यातून त्यांच्या ओंजळीत आलेला त्यांना दिसला. ओंजळीतील पाणी ओघळून गेल्याबरोबर त्या विंचवाने रामकृष्णांच्या हातांना दंश केला. लगेचच त्यांनी वेदनेने हात झटकला आणि विंचू नदीत पडून बुडायला लागला. त्याला बुडताना पाहून रामकृष्णांनी पुन्हा एकदा त्याला ओंजळीत घेतले आणि पुन्हा विंचवाने त्यांना दंश केला. पुन्हा त्यांनी वेदनेने हात झटकला. विंचू पाण्यात पडला. पुन्हा एकदा रामकृष्णांनी त्याला वाचविले. हे सारे पाहणारा एक माणूस त्यांना म्हणाला, महाराज, जो विंचू तुम्हाला वारंवार दंश करतो, त्याचा जीव तुम्ही का वाचवू पाहता? मरु दे ना त्याला पाण्यात बुडून! हे ऐकून रामकृष्ण उत्तरले, दंश करणे हा विंचवाचा धर्म आहे तर विंचवाचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे. कथा उपदेश : परोपकार हाच साधुचा धर्म असतो. जीव घेणार्‍याचा जीव वाचविणे हाच तो धर्म होय.
Monday, August 14, 2017 AT 08:53 PM (IST)
राजा बळी महान व्यक्तिमत्व असलेला पूज्य पुरुष होता. भगवान विष्णूने वामनरूप घेतले आणि बळीला पाताळात लोटले. त्याची मनस्थिती कशी आहे हे पाहण्यास विष्णू नारदाला म्हणाला, ‘नारदा ! एकदा बळीला भेटून ये.’ त्याप्रमाणे नारद बळीकडे गेले. बळीने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, ‘तू राज्यभ्रष्ट झालास. तुझे सर्व गमावले. आता तू कसा राहातोस हे प्रत्यक्ष पहावे म्हणून मी आलो.’ आपली अवस्था सांगताना बळी म्हणाला, ‘नारदा ! मी खरोखर समाधानी आहे. कारण जीवनामध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही. कोणतीही घटना निश्‍चित नाही. काळ सर्वांवर स्वामित्त्व गाजवतो. काळाचे अद्भूत रहस्य ओळखून मी कोणत्याही अवस्थेचे फार सुख-दु:ख करीत नाही. काळ देतो व तोच हरण करतो. भविष्याच्या पोटात काय असते कोणास ठाऊक ! म्हणून मी देह काळाच्या स्वाधीन करून मनाने स्वरूपचिंतन करतो. मला काळाचे बंधन नाही.’ कथा उपदेश : भक्ताला काळाचे बंधन नाही.
Friday, August 11, 2017 AT 09:12 PM (IST)
स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव होते नरेंद्र. या नरेंद्राच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त होणार होते. विद्यार्थ्यांचे ते लाडके शिक्षक असल्याने त्यांनीच आपल्या गुरुजींसाठी एक निरोप समारंभ आयोजिला होता. समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंडित ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांना आमंत्रण होते. ते बंगालमधील एक ख्यातनाम विद्वान आणि देशभक्त होते. आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊनही इंग्रजांची चाकरी करायची नाही असे ठरवून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले होते. तसेच ते पट्टीचे वक्ते हेते. अशा व्यक्तीसमोर आपल्यापैकी कोणी भाषण करायचे असा प्रश्‍न समारंभ आयोजित करणार्‍या मुलांना पडला. शेवटी नरेंद्रावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. अन् नरेंद्राने खरोखरच फार सुंदर भाषण करून सर्वांची मने जिंकली. भावमधुर शब्द आणि ओघवते वक्तृत्व यामुळे त्याचे बोलणे ऐकताना सर्वजण भारावून गेले. स्वत: ईश्‍वरचंद्रांनी त्याची पाठ थोपटली आणि आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले! हाच नरेंद्र जेव्हा पुढे स्वामी विवेकानंद झाला, तेव्हाही आपल्या अमोघ वक्तृत्वाने त्यांनी जग जिंकले.
Saturday, July 29, 2017 AT 08:50 PM (IST)
महात्मा गांधी आफ्रिकेत असतानाची ही गोष्ट. एक दिवस त्यांच्या नावाची तार आली. त्या तारेत त्यांचे थोरले बंधू लक्ष्मीदास हे 8 मार्च 1914 ला पोरबंदरला वारल्याचं कळवलं होतं! ती तार गांधीजींनी वाचली, अन लगेच दुसर्‍याजवळ दिली, ती वाचून तिथल्या त्यांच्या सगळ्या चाहत्यांना फार वाईट वाटलं. पण गांधीजींचं अंत:करण होतं खंबीर. त्यांचा ‘साह्यकर्ता दादा’ गेल्याचं ते दु:खदायक तर होतंच होतं. पण तरीही गांधीजींच्या नित्याच्या क्रमात काही खंड पडला नाही. आपलं काम रोजच्यासारखं ते संध्याकाळपर्यंत करीत राहिले. दररोज संध्याकाळी प्रार्थना ठरलेली. ती आटपली अन् सगळे जण गांधीजींकडे पाहतात, तो त्यांचा कंठ दाटून आला! डोळेही आसवांनी डबडबलेच. पण ते दु:ख गिळून, ते सर्वांना म्हणाले, ‘मी दिवसभर बोललो नाही, पण माझे वडील बंधू गेल्याची ती तार वाचली अन् मला अतिशय दु:ख झालं. पण काही झालं तरी, आपलं दैनंदिन काम हे चाललंच पाहिजे. त्यात खंड पडू देणं योग्य नाही. म्हणूनच या वेळपर्यंत मी कुणालाच काही सांगितलं नाही. मृत्यू हा ईश्‍वराधीन असतो. पण आपलं काम मात्र आपल्या स्वाधीनच. कथा उपदेश : स्वकर्म सतत करीत राहणं हीच ईश्‍वराची खरी पूजा होय.
Friday, July 28, 2017 AT 09:02 PM (IST)
एका नगरीत एक धनिक राहात होता. त्याला पाच मुले होती. त्या सर्वांची त्याने लग्ने केली. पहिल्या चारही भावांच्या बायका घरकामात आळशी होत्या. कामावरून त्यांच्यात भांडणे होत असत. पाचवी सून गरीब घरातील व सुशिक्षित होती. तिने आल्याबरोबर पाहिले, की घरकाम करायला कोणीही पुढे येत नाही. ती रोज पहाटे उठून सर्व घरकाम करू लागली. स्वादिष्ट भोजन बनवून सर्वांना जेवायला वाढून मग स्वत: जेवू लागली. त्यामुळे सासू तिच्यावर खूश झाली. सासू तिला म्हणाली, ‘तुला एकटीलाच सर्व काम करावे लागते म्हणून तुला राग येत नाही का? तेव्हा ती म्हणाली, ‘सासूबाई कामाने काही कोणी मरत नाही. उलट चांगला व्यायाम होतो व शरीर निरोगी राहते. स्वत:च्याच घरचे काम करण्यात लाज कसली? हे सर्व जावांनी ऐकले व लज्जेने त्यांची मान खाली गेली. तेव्हा त्यांना समजले, की घरचे काम सगळ्यांनी मिळून केले तर घरात आणखीनच आनंद निर्माण होईल. कथा उपदेश : स्वत:च्या उदाहरणाने आदर्श निर्माण करता येतो.
Thursday, July 27, 2017 AT 08:57 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: