Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 239
प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय 5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी आता थेट महामंडळाच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसहाय्य, राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून मिळणारे कर्ज आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतील नाबार्डचा कर्जनिधी महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर लागणारा विलंब टळणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सध्या केंद्र शासनाकडून मिळणारे केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि राज्य शासनाच्या हिश्यापोटी नाबार्डकडून मिळणारी कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा होते. राज्यातील प्रकल्पांसाठी हे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून वित्त विभागास प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यास मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित प्रकल्पांना निधी वितरित करण्यात येतो. या प्रक्रियेस बराच कालावधी लागतो. त्यामुळे हा निधी थेट महामंडळाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Wednesday, October 17, 2018 AT 09:02 PM (IST)
शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न 5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले असून दसरा मेळाव्यात शिवसेनेने टोकाचा निर्णय जाहीर करू नये यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा मंगळवारी स्वतः मुंबईत आल्याची चर्चा आहे. युतीबाबत प्राथमिक चर्चा करून पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार करताना शिवसेनेलाही त्यात सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दिल्लीत भाजपचे संघटन सरचिटणीस रामलाल यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे तर्क व्यक्त केले जात असले तरी शिवसेनेवर लोकसभा निवडणुकीत युती करण्याच्या दृष्टीने बैठकांचे सत्र सुरू असल्याचे समजते. अमित शहा सोमवारी दिल्लीबाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती पण आज स्वतः शहा मुंबईत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शहा यांची विमानतळावर अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर विलेपार्ले येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक शहा यांनी घेतली.
Wednesday, October 17, 2018 AT 08:52 PM (IST)
महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ 5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून 1 ऑक्टोबरपासून महागाई भत्तावाढ रोखीने देण्यात येणार आहे. राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांना मंजूर करण्यात येणार्‍या महागाई भत्त्याच्या दरात 1 जानेवारी 2018 पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील वेतनावरील देय महागाई भत्त्याचा दर 139 टक्क्यांवरून 142 टक्के करण्याचा, म्हणजे तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 1 ऑक्टोबर 2018 पासून रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2018 या नऊ महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा यासाठी कर्मचारी संघटनांनी ऑगस्टमध्ये तीन दिवसांचा संप केला होता.
Wednesday, October 17, 2018 AT 08:35 PM (IST)
उद्धव ठाकरे यांच्या सरकारला कानपिचक्या 5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) : घरपोच ‘ऑनलाइन’ दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका करताना दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा, अशा कानपिचक्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला दिल्या. ऑनलाइन दारू विक्रीला परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची बातमी बाहेर आल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज सरकारवर टीकास्त्र सोडले. ऑनलाइन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही, पण राज्याची ‘शोभा’ करण्याचे प्रयोग रोजच सुरू आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होईल. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका.  त्यांना घरपोच दारू नको तर मदत द्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.
Tuesday, October 16, 2018 AT 08:43 PM (IST)
शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 5भुईंज, दि. 15 : कृष्णा नदीपात्रात खडकी, ता. वाई गावच्या हद्दीत ग्रामस्थांना मोठी मगर दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. गतवर्षी अनेक गावांच्या हद्दींमध्ये कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर वाढल्याच्या भीतीने घबराट पसरली होती. दोन वर्षांपूर्वी चिंधवली येथे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍यांना आजही त्या आठवणींमुळे कापरे भरत असल्याचे बोलले जाते. खडकीच्या शिवारात कृष्णा नदीपात्रात रविवारी (दि. 14) आणि आज मगर दिसल्याने भीतीचे सावट आहे. त्यामुळे चिंधवलीपर्यंत घबराट पसरली आहे. मगरीपासून मुले, शेतकरी व जनावरांना धोका असून जिल्हा प्रशासनाने मगर पकडण्यासाठी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी खडकीचे उपसरपंच रमेश शिंगटे व शरद शिंगटे यांनी केली आहे.
Tuesday, October 16, 2018 AT 08:39 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: