Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 107
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका 5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : नोटाबंदी आणि ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचा निर्णय घाईघाईत घेतल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली आहे. या घटकांमुळे देशाचा विकासदर आणखी खालावेल, अशी भीतीही मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतते म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्हींचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. ‘जीएसटी’ची अंमलबजावणी घाईघाईने करण्यात आल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागले आहेत. चालू आर्थिक वर्षातील जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील जीडीपी 6.1 टक्क्यांवरून 5.7 टक्क्यांपर्यंत घटला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.9 टक्के होता. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या नोटाबंदीनंतर मनमोहनसिंग यांनी संसदेत मोदी सरकारवर टीका केली होती. नोटाबंदी ही ऐतिहासिक चूक आणि संघटित व कायदेशीर लूट आहे. त्यामुळे जीडीपीत दोन टक्के घट होईल, असे ते म्हणाले होते.
Tuesday, September 19, 2017 AT 09:09 PM (IST)
पंचकुला हिंसाचार प्रकरण 5चंदीगड, दि. 18 (वृत्तसंस्था) :  ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत रामरहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर हरियाणातील पंचकुला आणि सिरसामध्ये उफाळलेल्या प्रचंड हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या 43 ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांची यादी हरियाणा पोलिसांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये रामरहीमची कथित दत्तक मुलगी हनीप्रीतसिंग आणि ‘डेरा’चा प्रवक्ता आदित्य इन्सान यांची नावे अग्रक्रमावर आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या या यादीमुळे हनीप्रीतच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. ‘डेरा सच्चा सौदा’च्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. त्यात 38 जणांचा मृत्यू झाला तसेच 50 पेक्षा जास्त पोलीसही जखमी झाले. त्या दिवसापासून हनीप्रीत फरार आहे. तिला आणि डेरा सच्चा सौदाच्या इतर फरार अनुयायांना शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.  त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी एक नोटीसही जारी केली आहे. पंचकुलामध्ये उसळलेल्या दंगलीबाबत जो कोणी माहिती देईल, त्याबाबत गुप्तता पाळण्यात येईल.
Tuesday, September 19, 2017 AT 09:06 PM (IST)
अर्थव्यवस्थेचा आढावा घेणार 5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : नोटाबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळ आणि इंधन दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून केंद्र सरकारवर चौफेर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील चिंतीत असून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत उद्या (मंगळवार) बैठक घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीत अर्थव्यवस्थेपुढील समस्यांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या समस्या कमी होतात तोवर केंद्र सरकारने जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला. त्याचेही परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर गेल्या तीन वर्षांतील निचांकी पातळीवर आला आहे.      2016-17 च्या एप्रिल-जून या आर्थिक तिमाहीत 7.9 टक्के असलेला हा दर यंदाच्या याच तिमाहीत 5.7 टक्क्यांवर आला आहे. त्याचबरोबर किरकोळ महागाई निर्देशांक व घाऊक महागाई निर्देशांकही वाढला आहे. देशाची वित्तीय तूटही वाढली आहे.
Tuesday, September 19, 2017 AT 09:04 PM (IST)
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संकेत 5अमृतसर, दि. 18 (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल व डिझेलचे दर कमी होतील, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी दिले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांचे दर निम्म्याहून अधिक घसरले असतानाही देशात पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये तब्बल साडेसात रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीला सरकारने अबकारी व आयात करात केलेली वाढ कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80 रुपये झाले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी यापूर्वीची दर पंधरवड्याला दरांचा आढावा घेण्याची पद्धत बदलून 16 जूनपासून पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल करण्याची पद्धत सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि डॉलर-रुपया विनिमय दराचे प्रतिबिंब रोजच्या रोेज इंधन दरांमध्ये उमटावे आणि दरांमध्ये पारदर्शकता यावी, असा यामागचा उद्देश असल्याचे कंपन्यांनी सांगितले होते.
Tuesday, September 19, 2017 AT 09:00 PM (IST)
5जम्मू, दि. 15 (वृत्तसंस्था) :आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत असतानाही पाकिस्तानच्या भारतविरोधी ‘नापाक’ कारवाया सुरूच आहेत. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याने सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. त्यात उत्तर प्रदेशाचे जवान बिजेंद्र बहादूर हे शहीद झाले तर एक नागरिक जखमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू-जवळील आरएस पुरा सेक्टरमधील अर्निया भागात सीमा सुरक्षा दलाच्या एस. एम. बेस, बडवार आणि निक्कोवाल या चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्री 1.10 च्या सुमारास उखळी तोफांचा मारा आणि  गोळीबार केला. या गोळीबारात कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र बहादूर हे शहीद झाले. पाक सैन्याने सीमेजवळील गावांवरही उखळी तोफांचा मारा केला. मध्यरात्रीच्या सुमारास स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. उखळी तोफांच्या मार्‍यात देवीगढमध्ये एका घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
Saturday, September 16, 2017 AT 09:01 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: