Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 247
5नीरा, दि. 14 : नीरा खोर्‍यातील नीरा-देवघर, भाटघर धरण 100 टक्के भरल्याने व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने मंगळवारी सायंकाळी सात वाजता वीर धरण 100 टक्के भरले. त्यामुळे वीर धरणामधून 4637 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यात आल्याची माहिती वीर धरणाचे उपअभियंता अजित जमदाडे यांनी दिली. नीरा-देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसात चांगला पाऊस पडल्याने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भाटघर धरण 100 टक्के भरले. भाटघर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्याने वीर धरण मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास 100 टक्के भरले. दरम्यान, वीर धरण 100 टक्के भरल्याने धरणाच्या पाच नंबरच्या एका दरवाजातून 4637 क्युसेक्स  पाणी नीरा नदीत सोडण्यात आले.  भाटघर व नीरा-देवघर धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा प्रवाह सतत सुरू राहिला तर वीर धरणातून आणखी जादा पार्णी नीरा नदीत सोडण्यात येणार असल्याने नीरा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती उपअभियंता अजित जमदाडे यांनी दिली.
Thursday, August 16, 2018 AT 09:05 PM (IST)
5पाटण, दि. 14 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार पावसाने सुरूवात केल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात तब्बल 27 हजार 370 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढू लागला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दुसर्‍यावेळी मंगळवार दि. 14 रोजी दुपारी 12.15 वाजता अडीच फुटाने उचलून नदीपात्रात 21 हजार 281 क्युसेक्स आणि धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 असे एकूण 23 हजार 381 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. त्यामुळे 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणात सध्या 101.67 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे केवळ 3.58 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची गरज आहे. सध्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने दुसर्‍यांदा कोयना धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 10.
Thursday, August 16, 2018 AT 09:04 PM (IST)
विजय साळुंखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 5देशमुखनगर, दि. 14 : बोरगाव, ता. सातारा येथे सोमवारी रात्री झालेल्या चाकूहल्ल्यात येथीलच विजय तातोबा साळुंखे उर्फ अण्णा पाटील (वय 65) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या चाकू हल्ल्यातील इतर तिघांची प्रकृती स्थिर असून मंगळवारी बोरगाव येथील ग्रामस्थांनी या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळून निषेध व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास संशयित विशाल शितोळे हा दुचाकीवरून बोरगाव येथील उड्डाणपुलाखाली आला. तेथे त्याने दारूची बाटली फोडल्याने लोकांनी त्याला जाब विचारला. यावर विशाल शितोळे याने त्याच्याजवळील चाकूने तेथे असणार्‍या विजय तातोबा साळुंखे यांच्या पाठीत, अनिल देशमुख यांच्या पोटात, उत्तम रंगराव माळवे यांच्या हातावर व दीपक नामदेव साळुंखे यांच्या हातावर व मांडीवर वार केले. या हल्ल्यात विजय साळुंके व अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना विजय साळुंखे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून बोरगाव येथील वातावरण तणावाचे झाले होते.
Thursday, August 16, 2018 AT 08:45 PM (IST)
तीन दिवस पोलीस कोठडी 5दहिवडी, दि. 13 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हसवड व दहिवडी येथे कारवाया करत म्हसवड पोलीस ठाण्यातील हवालदारास ताब्यात घेतले होते तर दहिवडीचे पोलीस उपनिरीक्षक लाचेच्या रकमेसह फरार होण्यात यशस्वी ठरले होते. सोमवारी त्यांना अटक करण्यात एसीबीच्या पथकाला यश आले. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या बिअर बार हॉटेलवर झालेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला न पाठविण्यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश दबडे यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे 8 ऑगस्ट रोजी केली. तडजोडीअंती दबडे व तक्रारदार यांच्यात तेरा हजार रुपयांचा व्यवहार ठरला. ठरलेल्या व्यवहारानुसार पोलीस उपनिरीक्षक दबडे यांनी तक्रारदारास आपल्या खाजगी चार चाकी गाडीत घेवून गाडी पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढली. चालू गाडीत त्यांनी तक्रारदाराकडून तेरा हजारांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारल्याचे लक्षात येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
Tuesday, August 14, 2018 AT 08:28 PM (IST)
* पुणे, मुंबई, सातारा जिल्ह्यातील बैलगाड्यांचा समावेश * पोलिसांकडून बैलगाडी चालक व वाहने जप्त 5लोणंद, दि. 12 : संपूर्ण राज्यात बैलगाडी शर्यतींना बंदी असताना येथील निंबोडी रोडवर सुमारे पन्नासहून अधिक बैलगाड्या आणि पाचशेहून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत फाटी पद्धतीने दोन बैलगाड्यांमध्ये शर्यतींचा एक प्रकारे जुगार रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू होता. या सर्व प्रकारात कायदा व नियमांची पायमल्ली केली जाऊन लाखो रुपयांची उलाढाल खुले आम सुरू होती. या बैलगाडी शर्यतीमध्ये पुणे, मुंबई, सातारा आदी जिल्ह्यातील बैलगाडी चालक, मालक सहभागी झाले होते. या बैलगाडी शर्यतीची माहिती लोणंद पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर सर्वांचीच पळापळ झाली. या प्रकरणी काही बैलगाडी चालकांना वाहनांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, लोणंद येथे सरळ सरळ बैलगाड्यांच्या शर्यती असताना लोणंद पोलिसांनी मात्र बैलगाड्यांचा सराव सुरू असल्याचे कारण सांगत प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
Monday, August 13, 2018 AT 08:55 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: