Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 142
घंटागाडी चालकांच्या प्रश्‍नी बैठकीत आरोप-प्रत्यारोप 5सातारा, दि. 19 : छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये सातारा मशगूल असताना पालिकेत मात्र साशा कंपनी व संपकरी घंटागाडी चालक यांच्यात थकीत रकमेच्या विषयावरून जोरदार वादावादी झाली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केलेला शिष्टाईचा प्रयत्न सफल झाला नाही. चर्चेचे गुर्‍हाळ दीड तास चालले. मात्र तोडगा काहीच निघाला नाही. साशाचे भागीदार संचालक एस. आर. शिंदे , कर्मचारी युनियनचे सचिव गणेश भिसे, पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे या त्रयींची बैठक मुख्याधिकार्‍यांच्या दालनात झाली, मात्र प्रत्यक्ष चर्चेत आरोप- प्रत्यारोपच झाल्याने तोडग्यापेक्षा वादच होत राहिले. साशा कंपनीने 20 हजार वेतनाचे नियम ठरवून प्रत्यक्षात 8 हजार रुपये कमी वेतन दिले, प्रत्यक्ष कामाच्या वेळी घंटागाडी चालकांना दंड करण्यात आला, तसेच वेतनात न राखलेले सातत्य यासारख्या विविध विषयांची बाजू कामगार संघटनेचे सचिव गणेश भिसे यांनी मांडत थकीत वेतनासह बोनसची मागणी केली. तब्बल 4 महिने पगारच न मिळाल्याने घंटागाडी चालकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली.
Wednesday, February 20, 2019 AT 09:15 PM (IST)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दलात फेरबदल 5सातारा, दि. 19 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर केल्या आहेत. त्यांच्या जागी जिल्ह्याबाहेरील 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश सोमवार, दि. 28 रोजी काढण्यात आले आहेत. सातारा येथे बदली  होऊन येणार्‍यांमध्ये 3 महिला पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आणि कोठून, कोठे बदली झाली आहे ते पुढीलप्रमाणे : प्रमोद भास्कर कदम, नसीमखान हमीदखान फरास, विजय शामराव चव्हाण, सुनील खंडेराव पवार, अनिल विष्णू चौधरी, रवींद्र लक्ष्मण शिंदे, विलास गोविंद कुबडे, पोपट शंकर कदम यांची सातारा येथून कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. मैनुद्दिन अकबर खान, प्रकाश नामदेव इंगळे, योगेश अधिकराव शेलार, दिनेश जयसिंग कुंभार यांची सातारा येथून सोलापूर ग्रामीणला बदली करण्यात आली आहे.
Wednesday, February 20, 2019 AT 09:13 PM (IST)
5सातारा, दि. 19 : येथील जुन्या काळातील ज्येष्ठ छायाचित्रकार दत्तात्रय पुरुषोत्तम भिडे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दै. ‘ऐक्य’साठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. दत्तात्रय भिडे हे दत्ता भिडे या नावानेच सर्वपरिचित होते. काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सातारा येथील रामाचा गोट येथील निवासस्थानी आणण्यात आले. तेथे अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दत्ता भिडे यांचा येथील सदाशिव पेठेत प्रतिमा फोटो स्टुडिओ होता. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात त्यांच्या स्टुडिओत फोटो काढून घेण्यासाठी नेहमी गर्दी असायची. भिडे यांनी पूर्वीच्या काळात दै. ‘ऐक्य’मध्ये छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफीची जबाबदारीही चांगल्या पद्धतीने सांभाळली होती. उत्तम छायाचित्रकार असा त्यांचा लौकिक होता.
Wednesday, February 20, 2019 AT 09:04 PM (IST)
5सातारा, दि.17 : विवाहितेला मारहाण करून तिचा जाचहाट केल्या प्रकरणी पतीसह सासू, दीर व दोन नणंदा, अशा पाच जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पतीने आणखी एक विवाह केला असल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, पती गोरक्ष श्रीरंग दुदुस्कर (वय 39, मूळ रा. दुदुस्करवाडी, पो. महिगाव, ता. जावली) हा पोलीस पाटील असल्याचे समोर आले आहे. पती गोरक्ष, सासू कृष्णाबाई, दीर दत्तात्रय व नणंद रेणुका दरेकर, सुशीला परामणे, अशी गुन्हा दाखल झालेल्याची तर सौ. दीपाली गोरक्ष दुदुस्कर (वय 35, सध्या रा. राधिका रोड, सातारा), अशी तक्रारदार विवाहितेचे नाव आहे.   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,   तक्रारदार दीपाली व गोरक्ष यांच्या विवाहाच्या दुसर्‍या दिवसांपासून चेहरा व्यवस्थित नाही व स्वयंपाक व्यवस्थित येत नाही या कारणावरून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पतीचा जेसीबीचा व्यवसाय असल्याने त्यांनी त्यांच्या बहिणींकडून पैसे घेतले होेते. ते पैसे फरत फेडण्यासाठी दोन्ही नणंदा विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास द्यायच्या.
Monday, February 18, 2019 AT 08:50 PM (IST)
5सातारा, दि.17 : प्रतापसिंहनगर येथील लल्लन जाधव व त्याचा साथीदार बंटी लोमटे (रा.धनगरवाडी, सातारा) या दोघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागत लोखंडी रॉड, पट्टा व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दत्ता भरत उदागे (वय 22, रा. प्रतापसिंहनगर) या युवकाने ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दत्ता उदागे हा एमआयडीसीमधून जात असताना संशयितांनी त्याचा रस्ता अडवला. दारू पिण्यासाठी पैसे मागून त्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकीही लल्लन व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Monday, February 18, 2019 AT 08:36 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: