Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 9
मुंबई शहरातल्या श्रमिकांसाठी सलग 70 वर्षे आंदोलनाद्वारे सरकारशी झुंजणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांच्या निधनाने, महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. माहेरी आणि सासरीही स्वातंत्र्य चळवळीतल्या सहभागाचा वारसा मिळालेल्या कमलताईंच्या पतीचे विवाहानंतर अल्पावधीतच निधन झाले. आपले मेहुणे बाबूराव सामंत यांच्या सल्ल्याने त्या समाजवादी पक्षाच्या विविध आंदोलने आणि चळवळीत सक्रियपणे सहभागी झाल्या. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोेरे यांच्या त्या विश्‍वासू सहकारी आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असत. मृणालताई गोरे आणि कमल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निघालेल्या लाटणी मोर्च्यांची दहशत सरकारला होती. हजारो महिलांचे नेतृत्व करणार्‍या कमलताईंना मृणालताईंच्या बरोबरच पाणीवाली बाई असा लौकिक मिळाला होता. सर्वसामान्य आणि गोरगरीब महिलांच्या हंडा मोर्चांनी सरकारलाही सळो की पळो करून सोडले होते. मुंबई महापालिकेच्या त्या माजी नगरसेविका होत्या. 1973 मध्ये त्या मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या.
Friday, February 23, 2018 AT 08:48 PM (IST)
अरुणाचल प्रदेशातल्या तेजू शहरात संतप्त जमावाने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणार्‍या दोन संशयित आरोपींना बेदम मारहाण करून, जिवंतपणीच त्यांना जाळून ठार केल्याची थरारक घटना सोमवारी घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना, एक हजार लोकांच्या संतप्त जमावाने या कोठडीवरच भर दुपारी बारा वाजता जोरदार हल्ला चढवला. पोलिसांच्या उपस्थितीतच कोठडीचे कुलूप तोडून, या दोन्ही संशयितांना खेचून बाहेर काढले. या दोन्ही आरोपींना जमावाने चोपून काढले आणि नंतर विवस्त्र करून भर चौकातच त्यांना पेटवून दिले. या संशयितांचे मृतदेह चौकातच फेकून जमाव निघून गेला. या शहरातील पाच वर्षाची बालिका बेपत्ता झाल्यावर, तिच्या आई-वडिलांनी आणि लोकांनी तिचा शोध घेतला. नंतर पोलीस ठाण्यात बालिका बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पाच दिवसानंतर या बालिकेचा मृतदेह शहराजवळच्या चहाच्या मळ्यात सापडला. तो मृतदेह विवस्त्र होता आणि मुंडके तोडून या दुर्दैवी बालिकेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी पोलिसांनी संजय सोबोटो, वय 30 आणि जगदीश लोहर, वय 25, या दोन संशयित आरोपींना या बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अटक केली होती.
Wednesday, February 21, 2018 AT 08:41 PM (IST)
प्रशासनातले अधिकारी कागदी घोडे नाचवण्यात दंग झाल्यावर, चांगल्या मोहिमांचाही बोजवारा कसा उडतो, याची अनेक उदाहरणे आहेत. आदिवासींच्यासाठी डझनभर कल्याणकारी योजना सरकारने जाहीर केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणीच नीट होत नसल्याने, दरवर्षी आदिवासींच्या हजारो बालकांचे अपमृत्यू होतात. हजारो कळ्या खुडल्या जातात. गर्भवती आदिवासी महिलांसाठी पोषक आहाराची योजना कागदावरच राहते आणि या महिला मात्र कुपोषितच राहतात. अशा एकाच काय पण अनेक योजनांचा फज्जा उडाल्याचा पंचनामा विधिमंडळातही यापूर्वी अनेक वेळा झाला असला, तरी प्रशासनाच्या चालढकलीच्या आणि नियमांवर बोट ठेवून काम करायच्या पद्धतीत काही बदल होत नाही आणि या असंवेदनशील प्रशासनामुळेच अन्नदात्या धर्मा पाटील या वृद्धाला आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मंत्रालयात विष प्यावे लागते. स्वत:च्या प्राणांचे मोलही न्यायासाठी द्यावे लागते. जाहीर सभासमारंभातून मंत्री  फर्डी भाषणे ठोकत जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवायची आश्‍वासने देतात. विकासाच्या कामांसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यातली बरीचशी आश्‍वासने वार्‍यावरच विरतात.
Tuesday, February 20, 2018 AT 08:42 PM (IST)
दंगलखोर आणि हिंसक जमावाला पांगवायसाठी लष्करी दलाने जम्मू काश्मीर राज्यातल्या  शोपियान गावात 27 जानेवारी रोजी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाल्या प्रकरणी राज्य सरकारने या तुकडीचे प्रमुख मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दहाव्या गढवाल बटालियनचे प्रमुख असलेल्या आदित्य कुमार यांच्या तुकडीने हिंसक जमावाने जवानांनाच लक्ष्य केल्याने, गोळीबार केला होता. लष्कराने कारण नसताना              गोळीबार केल्यानेच तीन नागरिक ठार झाल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने काश्मीर राज्यातील रणबीर दंड संहितेअन्वये खुनाचा प्रयत्न, खून करणे अशा कलमाखाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. राज्य सरकारच्या या कृतीने काश्मीरमधल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानात अस्वस्थता निर्माण झाली होती.
Thursday, February 15, 2018 AT 08:51 PM (IST)
  देशाच्या सर्व भागात पतंग उडवायचा खेळ परंपरेने सुरू असला, तरी पूर्वी पतंग उडवायसाठी दोरा वापरला जात असे. पतंगांच्या काटा-कटीच्या खेळात आपला पतंग काटला जावू नये आणि दुसर्‍याच्या पतंगाचा दोरा काटला जावा, यासाठी काचेच्या चुर्‍याचा वापर करून मांज्याचा दोरा वापरला जात असे. गेल्या काही वर्षात मांज्याच्या या परंपरागत दोर्‍याच्या ऐवजी चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्याचा सर्रास वापर सुरू झाला. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने आधी पतंगाच्या काटाकाटीच्या खेळासाठी त्याचा वापर होत असे. पण, पुढे मात्र सर्रास गल्लीबोळ आणि छपरावर पतंग उडवणारी मुलेही हाच मांजा वापरायला लागली. गुजरातमध्ये संक्रांत ते फेब्रवारी अखेर दीड महिना राज्यभर उत्साहाने पतंगोत्सव साजरा होतो. नव्या खेळांच्या जमान्यातही पतंग उडवायचा उत्साह काही त्या राज्यात कमी झालेला नाही. पण, चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्यामुळे त्या राज्यात काही मुलांचे जखमी होऊन बळीही गेले आहेत. पक्ष्यांसाठी तर हा मांज्या म्हणजे मृत्यूचे सापळेच ठरतात. पक्ष्याचा पंख मांज्यात अडकल्यास त्याचा जखमी होऊन बळी जातो.
Tuesday, February 13, 2018 AT 08:40 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: