Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 90
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती 5हेग, दि. 17 (वृत्तसंस्था) : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. भारताच्या बाजूने 15 विरुद्ध 1 अशा मतांनी हा निकाल देण्यात आला. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी निकाल वाचन केले. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. पाकिस्तान जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करत नाही तोपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेसही दिला.
Thursday, July 18, 2019 AT 08:27 PM (IST)
आज निर्णय येणार 5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निकाल देणार आहे. या प्रकरणी आज न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत उद्या सकाळी 10.30 वाजता तो सुनावणार आहे. विधानसभा अध्यक्ष राजीनामे स्वीकारत नसल्याचे बंडखोर आमदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तर सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आमदारांना राजीनामा देण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारचे महाधिवक्ते राहिलेल्या रोहतगी यांनी बंडखोर आमदारांची बाजू न्यायालयात मांडली. आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार असल्याने त्यांना रोखले जाऊ शकत नाही. घटनात्मक व्यवस्थेनुसार आमदारांचे राजीनामे त्वरित स्वीकारायला हवेत, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली.
Wednesday, July 17, 2019 AT 08:25 PM (IST)
परिवर्तनासाठी एकजूट कायम ठेवण्याचा संकल्प 5सातारा, दि. 15  : आ. जयकुमार गोरे यांचे माण-खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून ‘आमचं आता ठरलंय’, आ. जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करुन ‘जयकुमार मुक्त’ माण मतदारसंघ करण्याचा निर्धार सोमवारी सातार्‍यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. दरम्यान त्यांना भाजपत प्रवेश तर देवू नयेच, मात्र एकास एक उमेदवार देवून त्यांच्या विरोधात सर्वसमावेशक आघाडी उभारुन परिवर्तनासाठी एकजूट कायम ठेवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. सातार्‍यातील प्रीती हॉटेल येथे आयोजित बैठकीला डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ, मामूशेठ वीरकर, सुभाषराव नरळे, अनिल माळी यांच्यासह माण-खटाव तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व नेतेमंडळी उपस्थित होती. आ. गोरे ज्या कुठल्याही पक्षातून उभे राहतील, तिथे सर्वपक्षीय उमेदवार एकमताने दिला जाईल, असा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.
Tuesday, July 16, 2019 AT 08:28 PM (IST)
5लंडन, दि. 14 (वृत्तसंस्था) : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या विश्‍वचषक स्पर्धा 2019 च्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरी झाली. त्यामुळे सुपर ओव्हर खेळविण्यात आली. परंतु सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार व षटकाराच्या निकषावर इंग्लंडला विश्‍वविजेता ठरविण्यात आले. आज झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर हेन्री निकोल्सने अर्धशतकी खेळी साकारली. तर टॉम लॅथमने 47 धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विल्यमसनने 30 धावा केल्या. इंग्लंडकडून अ‍ॅडम प्लंकेटने किवींच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी किवींवर वर्चस्व राखत फलंदाजांना वेसण घातली. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला (19) पायचीत करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने सावध खेळ करत मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला.
Monday, July 15, 2019 AT 08:24 PM (IST)
5पंढरपूर, दि. 12 (प्रतिनिधी) : ‘राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे! बळीराजाला तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझ्या महाराष्ट्राला सुजलाम्, सुफलाम् व संपन्न होऊ दे...’ असे साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरच्या विठुरायाला घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीने हा पूजा विधी पार पडला. महापूजेनंतर मंदिर समिती व मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण कर, असे साकडं आपण विठ्ठलाला घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांना मागील आषाढी एकादशीला पंढरपूरला येता आले नव्हते, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तेव्हा विठ्ठलाचाच तसा आदेश होता. तो आदेश मानून ‘वर्षा’ बंगल्यावरच पूजा केली. आताही त्याच्याच आशीर्वादाने पंढरपुरात आलो.
Saturday, July 13, 2019 AT 08:47 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: