Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 56
लवकरच वैद्यकीय आस्थापना कायदा : डॉ. सावंत 5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : खासगी रुग्णालयांकडून रुग्णसेवेसाठी भरमसाट बिल आकारणी करून रुग्णांची अक्षरशः लूट केली जाते. यावर नियंत्रण आणण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्राने लागू केलेला ‘क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ लवकरच राज्यातही लागू केला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली. विधानसभेत रक्तपेढ्यांबाबत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ‘क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट अ‍ॅक्ट’संदर्भात अनेक संघटनांशी चर्चा करण्यात आली असून या संदर्भात फाईल अंतिम मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. दिलीप वळसे-पाटील यांनीही या अनुषंगाने प्रश्‍न उपस्थित करत भरमसाट बिले आकारणार्‍या रुग्णालयांवर काय कारवाई करणार, असा उपप्रश्‍न उपस्थित केला. भरमसाट बिले आकारणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देतानाच हा कायदा कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांसाठी मारक ठरू नये यासाठी काळजी घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Friday, December 15, 2017 AT 08:39 PM (IST)
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब 5नागपूर, दि. 12 (प्रतिनिधी) : शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज पुन्हा गदारोळ होऊन दिवसभराचे कामकाज तहकूब करावे लागले. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासाठी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विधानपरिषदेतही याचीच पुनरावृत्ती झाली. शेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज विधिमंडळावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासूनच विरोधक आक्रमक होते. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायर्‍यांवर धरणे आंदोलन करुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्षांनी काही वेळासाठी तब्बल तीन वेळा कामकाज तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्याने तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी बुधवारपर्यंत कामकाज तहकूब केले.
Wednesday, December 13, 2017 AT 08:49 PM (IST)
5मुंबई, दि. 8 (वृत्तसंस्था) :पैशांच्या अफरातफर प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर 18 डिसेंबरला मुंबईतील पीएमएलए न्यायालय निर्णय देणार आहे. भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून अटकेत आहेत. या आधी पीएमएलए न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.    मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम 45(1) घटनाबाह्य ठरवून नुकतेच रद्द केले आहे. त्यामुळे भुजबळांना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ हे निर्दोष असल्याचा पुनरुच्चार त्यांच्या वकिलांकडून आज विशेष न्यायालयात करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम 45 मध्ये केलेल्या बदलानंतर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) भुजबळ यांची कोठडी मागण्याचा अधिकार नाही, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला.
Saturday, December 09, 2017 AT 08:43 PM (IST)
काँग्रेस-राष्ट्रवादीची नऊ मते फुटली 5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवून सहज विजय मिळवला. लाड यांना तब्बल 209 तर काँग्रेसच्या दिलीप माने यांना केवळ 73 मते मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची तब्बल 9 मते या निवडणुकीत फुटल्याने पुन्हा एकदा भाजपला ‘अदृश्य हातांची’ मदत झाली आहे. काँग्रेसला रामराम ठोकून भाजप बरोबर गेलेल्या नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे प्रसाद लाड मोठ्या फरकाने निवडून आले. निष्ठावंतांना डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये असलेली नाराजी आणि शिवसेना-भाजप युतीतील तणाव यामुळे युतीची काही मते फुटतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. उलट भाजप - शिव-सेनेची 185 मते असताना प्रसाद लाड तब्बल 209 मते घेऊन निवडून आले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला 208 मते मिळाली होती. त्यापेक्षा एक जास्त मत यावेळी मिळाले. काँग्रेस व राष्ट्रवादीची 83 मते आहेत.
Friday, December 08, 2017 AT 08:39 PM (IST)
कोणाची मते फुटणार याकडे लक्ष 5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (गुरुवार) मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड व काँग्रेसचे दिलीप माने यांच्यातील लढत एकतर्फी दिसत असली तरी कोणाची, किती मते फुटणार याबाबत उत्सुकता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार असून भाजपचे पारडे जड आहे. मात्र, मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपबरोबर गेलेल्या नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने राणे यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. विजयासाठी 145 आमदारांचे पाठबळ आवश्यक असून भाजपची 122 व शिवसेनेची 63, अशी एकूण 185 मते लाड यांच्याकडे आहेत. शिवाय अपक्ष व अन्य अशा 10 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या दिलीप माने यांच्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीची 81 व अन्य सात, अशी एकूण 88 मते आहेत.
Thursday, December 07, 2017 AT 08:48 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: