Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 27
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) :मागण्या मान्य होऊनही त्याची सरकारकडून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दिरंगाई केली जात असल्याने चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी गुरुवारपासून दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या संपाची हाक दिली असून यानंतरही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर 27 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाच्या मागण्यांची फाईल मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला हवा होता पण त्यांच्या उदासीन धोरणामुळे कुठलीच हालचाल झालेली नाही. या परिस्थितीत शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाला नाइलाजाने उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर जावे लागत आहे. त्याला मुख्यमंत्रीच कारणीभूत असल्याचे महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे. संपाचा इशारा देऊनही शासकीय पातळीवरून कुठलीही हालचाल होत नसल्याने दोन दिवसांचा संप अटळ आहे.
Thursday, September 21, 2017 AT 09:38 PM (IST)
सर्वपक्षीय असंतुष्टांना एकत्र आणण्याची खेळी 5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : काँग्रेसचे नाराज नेते नारायण राणे गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपली पुढील दिशा स्पष्ट करणार असून ते थेट भाजपमध्ये प्रवेश करणार, की वेगळा गट स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे थेट भाजपमध्ये न जाता तूर्तास समांतर स्वाभिमानी काँग्रेस स्थापन करून सर्व पक्षातील असंतुष्टांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील, अशी जोरदार चर्चा आहे. राणे एकटेच उद्या काँग्रेस सोडण्याची घोषणा करणार असून त्यांचे चिरंजीव तूर्तास तांत्रिकदृष्ट्या का होईना काँग्रेसमध्येच राहण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नारायण राणे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू आहे. मध्यंतरी त्यांनी अहमदाबाद येथे जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेटही घेतली होती परंतु त्यांच्या व त्यांच्या पुत्राच्या राजकारणाची धाटणी पुढील काळात डोकेदुखी ठरेल, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळेच राणे यांचा प्रवेश रखडल्याची चर्चा आहे.
Thursday, September 21, 2017 AT 09:33 PM (IST)
अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्यावर टीकास्त्र 5कुडाळ, दि. 18 (वृत्तसंस्था) : अशोक चव्हाण, मोहन प्रकाश हे राज्यात काँग्रेस संपवत असून मी काय आहे, हे त्यांना अजून समजलेलेच नाही. मला डिवचले की, माझी ताकद दुप्पट होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला गुरुवारी (दि. 21) भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले. मी खूप पुढे आलोय, फक्त आता तुम्ही साथ सोडू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी समर्थकांना केले. नारायण राणे यांनी कुडाळमध्ये सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेसने राणे यांचे नेतृत्व मानणारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती शनिवारी बरखास्त केली. जिल्हा-ध्यक्षपदी राणे यांचे पक्षांतर्गत विरोधक विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर राणेंनी चौफेर टीका केली.
Tuesday, September 19, 2017 AT 09:05 PM (IST)
सरपंचांची थेट निवडणूक, 7 व 14 ऑक्टोबरला दोन टप्प्यात मतदान 5मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी जाहीर केला. या निवडणुकीसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. एकूण 80 हजार सदस्य ग्रामपंचायतींवर निवडून जाणार असून त्यातील पन्नास टक्के म्हणजे 40 हजार सदस्य या महिला असणार आहेत. निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. ज. स. सहारिया यांनी 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमधील 18 जिल्ह्यातील 3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोकण, पुणे, नागपूर महसुली विभागातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 16 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Saturday, September 02, 2017 AT 09:07 PM (IST)
नाशिक व पुणे येथे सर्वाधिक मृत्यू 5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे तब्बल 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 60 टक्के रुग्ण हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा आजारांनी ग्रस्त होते. नाशिक व पुणे येथे सर्वाधिक मृतांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. स्वाईन फ्ल्यूमुळे सर्वाधिक म्हणजे 40 मृत्यू नाशिक महापालिका क्षेत्रात झाले आहेत. त्या खालोखाल पुणे महापालिका 36 आणि पुणे ग्रामीणमध्ये 31 रुग्ण दगावले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात स्वाईन फ्ल्यूचे प्रमाण कमी आहे. या भागातील बीड, धुळे, वाशीम, जळगाव, जालना या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा या जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वाईन फ्ल्यूचा आढावा घेणारी बैठक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.
Saturday, August 19, 2017 AT 08:48 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: