Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 44
5शहाजहानपूर, दि. 20 (वृत्तसंस्था) :  बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिन्मयानंद यांना शाहजहानपूर तुरुंगात ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. शहाजहानपूर येथे चिन्मयानंद यांचे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे  पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनेही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला होता. चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीने दिली होती. हे प्रकरण चिघळणार असे दिसताच चक्रे फिरली आणि आजअखेर अटकेची कारवाई झाली. अटकेनंतर आज लगेचच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Saturday, September 21, 2019 AT 08:50 PM (IST)
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर व्हायला विलंब लागत असल्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये विशेषतः विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. 2014 मध्ये 12 सप्टेंबर रोजी निवडणुकीची तारीख जाहीर होऊन राज्यात आचारसंहिता लागू झाली होती. मात्र, 2014 मधील निवडणूक जाहीर होण्याची तारीख लक्षात घेतली असता ही तारीख जाहीर व्हायला 10 दिवसांचा विलंब झाला आहे. पंतप्रधानांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता होती. मात्र आजही तारीख जाहीर झालेली नाही. दुसरीकडे राज्य सरकारने गेल्या दोन दिवसात तब्बल 281 निर्णय जारी केले आहेत. यात 18 सप्टेंबर रोजी 122 आणि 19 सप्टेंबर रोजी 159 निर्णयांचा समावेश आहे. आजच्या निर्णयांची संख्या रात्री उशिरा उपलब्ध होणार आहे. आपल्या जवळच्या लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेता यावेत यासाठी आचारसंहितेच्या तारखा लांबवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जावू लागला आहे.
Saturday, September 21, 2019 AT 08:49 PM (IST)
5मुंबई, दि. 19 : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसेच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे 25 उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसेच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टिकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये काडीमोड झाला होता. त्यानंतर एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली.
Friday, September 20, 2019 AT 08:41 PM (IST)
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : तेल संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 642 अंकांनी कोसळला आहे. सौदी अरेबियातील तेल कंपनीवर झालेला ड्रोन हल्ला आणि चीनमधील कमकुवत आर्थिक स्थितीचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 642.22 अंक म्हणजेच 1.73 टक्के घसरणीसह 36,481.09 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीतही 185 अंकांची घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर 1.69 टक्के घसरणीसह निफ्टी निर्देशांक 10, 817.60 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 27 कंपन्यांच्या समभागात घसरण पाहायला मिळाली तर निफ्टीतील 44 कंपन्यांचे समभाग घसरले. सौदी अरेबियातील मुख्य तेल कंपनीवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल संकट चांगलेच गडद झाले आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन निम्म्यानी घटल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. जागतिक स्तरावरील निर्देशांकामध्येही घसरण सुरू आहे. आशियाई निर्देशांकही लाल निशाण्यावर आहेत. याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Wednesday, September 18, 2019 AT 08:36 PM (IST)
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली आहे. आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत दिलेली माहिती पूर्णत: खोटी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा उतावीळ कारभार पाहता, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’, अशी अवस्था असल्याचा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सुरू केलेल्या जाहिरातबाजीचा समाचार घेताना ते म्हणाले, सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. असे असताना ‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’, या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. परंतु या जाहिरातबाजीतील दावाही खोटा निघाला आहे. आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेमुळे ‘आरोग्यदायी झेप’ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नाही.
Wednesday, September 18, 2019 AT 08:31 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: