Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 36
5श्रीनगर, दि. 15 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या स्नायपर्सनी मंगळवारी सकाळी 10.50 च्या सुमारास केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी विनय प्रसाद हे शहीद झाले. दरम्यान, नियंत्रण रेषेवर राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर देताना जोरदार गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक कमांडंट विनय प्रसाद यांचे पथक आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर-सांबा सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी गस्त घालत असताना 10.50च्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सच्या स्नायपर्सनी या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला.      त्यामध्ये विनय प्रसाद हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे त्यांना वीरमरण आले. सीमा सुरक्षा दल विनय प्रसाद यांच्या हौतात्म्याला सलाम करत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.
Wednesday, January 16, 2019 AT 09:20 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी आज (रविवारी) ही वाढले. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेली ही मोठी दरवाढ आहे. ही दरवाढ करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 49 पैसे तर डिझेलच्या दरात 59 पैसे प्रतिलिटरने दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 48 पैसे आणि डिझेल 59 पैसे प्रतिलिटर दराने वाढले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 69.75 रुपये, मुंबई 75.39 रुपये प्रतिलिटर झाले. तर डिझेलचा दर मुंबईत 66.66 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.      आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली आहे. मात्र, या दरवाढीचा परिणाम भारतावर दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकर कपातीची शक्यता कमी आहे, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Monday, January 14, 2019 AT 08:46 PM (IST)
घटनापीठातून न्या. उदय लळित यांची माघार 5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या वाद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. न्या. उदय लळित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे आता नव्याने घटनापीठ गठीत करावे लागणार आहे. आता 29 जानेवारीला नव्या घटनापीठासमोर सुनावणीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी सुरू झाली असताना मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी न्या. उदय लळित यांच्या संदर्भातील एक बाब घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिली. न्या. लळित यांनी 1994 मध्ये राम मंदिर आंदोलनाशी संबंधित न्यायालयाच्या अवमान प्रकरणात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांची बाजू अलाहाबाद न्यायालयात मांडली होती, असे अ‍ॅड. धवन यांनी सांगितले. मात्र, या घटनापीठापासून न्या.
Friday, January 11, 2019 AT 08:50 PM (IST)
पंख छाटले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निवड समितीला पुढील निर्णय घेण्याचा आदेश 5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : सीबीआयचे संचालक आलोककुमार वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील अंतर्गत कलह सार्वजनिक झाल्यामुळे आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरवला. न्यायालयाने वर्मा यांची सीबीआयच्या प्रमुखपदी पुनर्स्थापना केली आहे. दरम्यान, हा निर्णय देताना न्यायालयाने वर्मा यांचे पंख छाटले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत वर्मा यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या उच्चाधिकार निवड समितीने वर्मा यांच्याबाबत एका आठवड्यात पुढील निर्णय घ्यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे.
Wednesday, January 09, 2019 AT 08:34 PM (IST)
5कोलकाता, दि. 6 (वृत्तसंस्था) : कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी (आपत्कालीन) स्थिती जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री एअर इंडियाच्या विमानातून अचानक इंधन गळती सुरू झाल्यानंतर विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विमानतळ आणि विमानातील सर्वजण सुखरूप आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री विमान क्रमांक एआय-335 बँकॉकहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानातून अचानक इंधन गळतीला सुरूवात झाली. विमानामध्ये 150 प्रवासी होतो. सर्वजण सुखरूप आहेत.  शनिवारी रात्री एअर इंडियाचे एआय-335 बँकॉकहून दिल्लीला निघाले होते. विमानाने भारतीय हवाई क्षेत्र प्रवेश केल्यानंतर तांत्रिक अडचण आल्याचे वैमानिकाला समजले. त्यानंतर वैमानिकाने कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
Monday, January 07, 2019 AT 08:47 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: