Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 16
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : मुस्लिमांमधील तिहेरी तलाक अथवा झटपट घटस्फोट घेण्याच्या प्रथेवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक मांडण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने या संदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यासाठी संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने यावर्षी ऑगस्टमध्येच तिहेरी तलाक अवैध असल्याचा ऐतिहासिक निकाल तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने दिला होता. ही प्रथा रद्द करण्यासाठी सरकारने कायदा करावा, असेही न्यायालयाने सुचवले होते. त्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली असून हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे. घटनापीठात असलेले तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. अब्दुल नझीर यांनी दिलेल्या अल्पमताच्या निकालात तिहेरी तलाक ही प्रथा अवैध नसून मुस्लिमांचा मूलभूत धार्मिक अधिकार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही प्रथा वैध ठरवतानाच ही प्रथा सहा महिन्यांसाठी स्थगित ठेवावी, असे म्हटले होते. या कालावधीत सरकारने संसदेत या प्रथेवर बंदी घालणारे विधेयक आणावे.
Wednesday, November 22, 2017 AT 08:53 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : शत्रू सैन्याच्या सीमेत घुसून लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-30 एमकेआय या लढाऊ जेट विमानातून प्रथमच घेतली जाणार आहे. या चाचणीची पूर्वतयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आवाजाच्या तिप्पट वेगाने मारा करण्यास सक्षम असणार्‍या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी या आधी लढाऊ विमानातून करण्यात आलेली नाही. मात्र, या महिन्यात ब्राह्मोसची चाचणी सुखोई-30 एमकेआय विमानातून केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या युद्ध सज्जतेत वाढ होणार आहे. दोन इंजिन असलेल्या सुखोई लढाऊ विमानातून 2.4 टन किलो वजनाच्या ब्राह्मोसची चाचणी घेण्यात येईल. लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येत असल्याने मारक क्षमतेत दुपटीने वाढ होणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
Wednesday, November 15, 2017 AT 08:55 PM (IST)
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्यांना दिलासा 5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ज्या लोकांनी 31 डिसेंबर 2016 पर्यंत बदलून घेतल्या नाहीत आणि ज्यांनी नोटाबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार नाही, अशी हमी केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. दरम्यान, या संदर्भातील सर्व याचिका नोटाबंदीच्या निर्णयाची वैधता तपासण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. नोटाबंदीमुळे रद्द झालेल्या 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा डिसेंबर 2016 नंतरही जवळ बाळगल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्‍यांच्या विरोधात कारवाई होणार नाही.  मात्र, याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकांमध्ये जेवढ्या रकमेचा उल्लेख केला आहे, तेवढ्या रकमेसाठीच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अधिकच्या रकमेसाठी कारवाई होऊ शकते, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आज सांगितले.
Saturday, November 04, 2017 AT 08:58 PM (IST)
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा 5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या (नॅशनल टॅलेंट सर्च) दुसर्‍या टप्प्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली. या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे जावडेकर यांनी ट्विट करून सांगितले आहेत. या परीक्षेत अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. त्यामध्ये आता ओबीसी विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येईल. 2018 च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरू झाले आहे. 2019 साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे. सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्ती एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये होणार आहे. पीएच. डी.साठी देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीत विद्यापीठ  अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे बदल होईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
Wednesday, November 01, 2017 AT 09:03 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर मंदावल्याने केंद्र सरकारवर तुटून पडलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोमवारी पुन्हा हल्लाबोल केला. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन विनाशकारी ‘टॉर्पेडों’मुळे अर्थव्यवस्था बुडाली. त्यामुळे संपूर्ण देशाचे नुकसान झाले, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. वस्तू आणि सेवा कर ही चांगली संकल्पना आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, असे ते म्हणाले. जीएसटी आणि नोटाबंदी-विरोधात सोमवारी राहुल गांधी यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. जीएसटीबाबत राहुल गांधींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबरही चर्चा केली. सुमारे तीन तास बैठकांचे सत्र सुरू होते. नोटाबंदीला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त काँग्रेसकडून देशभरात ‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत राहुल गांधींनी नेत्यांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी भाजपचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. 8 नोव्हेंबर हा दुःखद दिवस होता.
Tuesday, October 31, 2017 AT 08:56 PM (IST)
1 2 3 4
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: