Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 80
मोबाईलवर बोलत रेल्वे फाटक क्रॉसिंग करतानाची घटना 5वडूज, दि. 25 : मानेवाडी, ता. खटाव येथील विनीत माने (वय 19) याचा रेल्वेखाली सापडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी, विनीत माने हा मुंबई येथे व्होला कंपनीमध्ये टुरिस्ट व्यवसाय करत होता. बुधवारी रात्री 10 वाजता तो मित्रांसोबत घरी निघाला होता. जाताना मोबाईलवर बोलत तो वाटेत असलेला रेल्वे मार्ग ओलांडत होता. चालत चालत त्याचे मित्र पुढे गेले व तो मागे राहिला. फोनवर बोलण्याच्या गोंधळात रेल्वे आलेली त्याच्या लक्षातच न आल्याने त्यास रेल्वेने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, की त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. मानेवाडी येथे त्याच्यावर गुरुवारी रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास परिसरातील जनसागर लोटला होता. त्याच्या घरची परस्थिती गरिबीची आहे. वडील मुंबई येथे रंगकाम करत आहेत. त्याच्या मृत्यूने मानेवाडी व कातरखटाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
Saturday, May 26, 2018 AT 08:57 PM (IST)
5कराड, दि. 24 : येथील दैत्यनिवारणी मंदिर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी लगेच विवाह सोहळ्यात पोहोचले आणि त्यांनी विवाह रोखला. दरम्यान, पोलिसांकडून कायद्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे पालकांनी मान्य केले. याबाबत माहिती अशी, कराड येथील दैत्यनिवारणी मंदिर परिसरात गुरुवारी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भरत चंदनशीव, पोलीस नाईक सचिन साळुंखे, संग्राम भुताळे व मोरे हे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी वधू-वराच्या वयाची माहिती घेतली असता मुलीचे वय 17 वर्षे असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीच्या पालकांना कायद्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करण्याचे मान्य केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह थांबविण्यात यश आले. एखाद्या ठिकाणी बालविवाह सुरु असल्यास संबंधित पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Friday, May 25, 2018 AT 08:39 PM (IST)
5वाई, दि. 23 :  शांतीनगर (फुलेनगर) येथील अजित उर्फ अंकुश अरविंद जमदाडे (वय 27) याचा विजेची तार अंगावर पडून शॉक लागल्याने मृत्यू झाला. अजित मुंबई पोलीस दलात सीटीएस कमांडो म्हणून कार्यरत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अजित जमदाडे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. आपल्या पत्नीसह तो दोन दिवसांपूर्वी पाच दिवसांची सुट्टी घेवून गावी आला होता. मंगळवारी (दि.22) सायंकाळी शेवग्याची पट्टी नावाच्या शिवारात उसाला पाणी देण्यासाठी तो गेला होता. सायंकाळी 7 पर्यंत तो घरी न आल्याने पत्नी पूजा व वडील दोघे जण त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याच्या अंगावर विजेची तार पडलेली दिसली. पूजाला मानसिक धक्का बसल्याने ती त्याच्या अंगावरच कोसळली. त्यामुळे तिलाही विजेचा धक्का बसला. तिच्या उजव्या दंडास व हातास जखमा झाल्या. वडील अरविंद यांनी हाताने विजेची तार दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही विजेचे धक्के बसले. परंतु तशातही त्यांनी तार बाजूला काढल्यामुळे पूजाचे प्राण वाचले.
Thursday, May 24, 2018 AT 08:44 PM (IST)
5पाचगणी, दि. 22 : पाचगणी, ता. महाबळेश्‍वर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात लोकांवर हल्ला करून 12 जणांना चावा घेतला. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने तायघाट परिसरात धुडगूस घातला. या ठिकाणी तीन ते चार जणांचा चावा घेतल्यानंतर या कुत्र्याने आपला मोर्चा पाचगणीकडे वळविला. शहराच्या विविध परिसरात त्याने नागरिकांना चावून जखमी केले. काही जणांनी तातडीने पाचगणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. ग्रामीण रूग्णालयात रेबीज लसीची कमतरता असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठवले. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना पाचगणीत घडल्या आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पाचगणी हे जसे शिक्षणाचे महत्त्वाचे ठिकाण आहे तसे ते पर्यटनाचे देखील मुख्य ठिकाण आहे.
Wednesday, May 23, 2018 AT 09:20 PM (IST)
5म्हसवड, दि. 21 : कुकुडवाड, ता. माण येथे पाणी फौंडेशनच्या कामावर काळवाटाच्या शिवारात मशिनरीचे काम सुरू असून सोमवारी सकाळी पोकलॅन मशीन चालवण्याच्या किरकोळ वादातून ऑपरेटर सोनूकुमार राम (वय 23, मूळ रा. झारखंड) याचा खून झाला. या घटनेनंतर संशयित संतोष (पूर्ण नाव माहीत नाही.) हा पसार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून म्हसवड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कुकुडवाड येथील राजेंद्र काटकर यांच्या काळवाट नावाच्या शिवारात पाणी फौंडेशनचे काम सुरू आहे. या कामावर धनेश सदाशिव घनवट (रा. आगोती, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या पोकलॅनवर संतोष (पूर्ण नाव माहीत नाही, रा. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक.) व सोनूकुमार राम (वय 23) हे दोघे ऑपरेटर म्हणून काम करत होते. गेले 44 दिवस पोकलॅन चालवण्याचे काम दोघांनी केले. पाणी फौंडेशनचे काम दोन दिवस बाकी असताना सोनूकुमार व संतोष यांच्यात पोकलॅन मशीन कोणी चालवायचे यावरून रविवारी रात्री वाद झाला होता. याच वादातून संतोषने सोमवारी सकाळी सोनूकुमार रामच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.
Tuesday, May 22, 2018 AT 08:54 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: