Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 33
5पाटण, दि. 12 : मोरगिरी विभागातील किल्ले मोरगिरी परिसरात मळे नावाच्या शिवारात शेतामध्ये काम करत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने शेतकरी कृष्णत रामू लाड (वय-46) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सध्या कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वनविभागाने जखमी लाड यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, किल्ले मोरगिरी येथील कृष्णत रामू लाड (वय 46) हे दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे जनावरांना घेवून मळे नावाच्या शिवारात गेले होते. त्या ठिकाणी बैलांना बांधल्यानंतर ते स्वमालकीच्या उसाच्या शेतामध्ये पाचट काढण्यासाठी गेले. त्या ठिकाणी उसाच्या फडातून अचानक कृष्णत लाड यांच्यावर रानडुकराने जोरदार हल्ला केला. जखमी अवस्थेत ते विव्हळत पडले असताना शेजारी  शेतामध्ये काम करणार्‍या शेतकर्‍यांनी धावत येवून रानडुकराला हुसकावून लावले. त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याने कृष्णत लाड यांना तत्काळ पाटण येथील  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
Monday, August 13, 2018 AT 08:53 PM (IST)
5भुईंज, दि.10 : किसनवीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी कोकण सम्राट आंब्याची लागवड ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल..’ च्या गजरात करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक ह. भ. प. विजय चव्हाण, पंढरपूरहून आवर्जून आलेले वारकरी व शेतकरी जैनवाडी (ता. पंढरपूर) सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गोफणे, ग्रामपंचायतीचे सदस्य भीमराव लिंगळे, सोसायटीचे माजी चेअरमन दादा दाणोळे, ह.भ.प. विठ्ठल शिंदे, नारायणराव सकुंडे, नानासाहेब सकुंडे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सांगली येथील पार्वती अ‍ॅग्रो प्लॉस्टचे  प्रमोद सारडा, शेखर भोसले-पाटील, किशोरकाका बाबर, राहुल तांबोळी, हणमंतराव गायकवाड, शंकर खोत, आनंद जाधवराव, हणमंत मगर, विशाल सावंत, अक्षय बाबर, विक्रम दुधे-पाटील, यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी हापूस (अल्फान्सो) व अमेरिकन-मॅक्सिकन व्हरायटी टॉमीअ‍ॅटकीन्स या आम्रवृक्षाच्या संक्रमणातून कोकण सम्राट ही नवीन आंब्याची जात विकसित केली आहे. ही नवीन आंब्याची जात दरवर्षी फळे देणारी असून साका विरहित आहे.
Saturday, August 11, 2018 AT 08:54 PM (IST)
5ओगलेवाडी, दि. 9 : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या बंदला ओगलेवाडी व विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड-विटा रस्त्यावर सकाळपासून आंदोलकांनी अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला. दिवसभर ओगलेवाडीची बाजारपेठ बंद राहिली. कराड-विटा मार्गावर कृष्णा कॅनॉल, पाटणकर मळा, रेल्वे पूल, टेंभू रस्ता,  ओगलेवाडी मुख्य चौक, वनवासमाची, राजमाची येथे आंदोलनकांनी रस्त्यावर उतरून रास्ता-रोको करत ठिय्या आंदोलन केले.  रेल्वे पुलावर आंदोलनकर्त्यांनी गाय, म्हैस, शेळ्या आणून रास्ता-रोको केला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या तर राजमाची व ओगलेवाडी चौकात भजन करून आंदोलन करण्यात आले. पाटणकर मळा येथे टायर जाळून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिसरातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेली ओगलेवाडीतील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. या बंदमुळे बाहेरगावाहून रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची मात्र वडाप व इतर वाहतूक बंद असल्यामुळे मोठी गैरसोय झाली.
Friday, August 10, 2018 AT 08:35 PM (IST)
5दहिवडी, दि. 7 : उरमोडीचे पाणी येत्या पंधरा दिवसात पिंगळीच्या कालव्याद्वारे ओढ्यात सोडून गोंदवल्यासह इतर गावांचा पाणी प्रश्‍न सोडवू, असा शब्द आ. जयकुमार गोरे यांनी दिला. उरमोडी योजनेतून पिंगळी तलावात पाणी सोडण्यासाठी पाटाची कामे सुरू आहेत. या पाटातून पिंगळी खुर्द व वाघमोडेवाडी ओढ्यात लवकरात लवकर पाणी सोडावे व शेतीसह जनावरांसाठीचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी वाघमोडेवाडीत शेतकर्‍यांनी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला शिवाजीराव वाघमोडे, अजित पोळ, श्रीकृष्ण कट्टे, मोहनराव शेलार, आनंदराव भोसले, विठ्ठलराव काळे, हणमंतराव जाधव, महादेव अवघडे, वसंतराव वाघमोडे, बबनराव काळेल, सतीश अवघडे, राजेंद्र कट्टे, संतोष कट्टे, उल्हास वाघमोडे, उरमोडी प्रकल्प कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड, उपअभियंता स्वप्निल पवार, विजयराव राजमाने तसेच गोंदवले बुद्रुक, खुर्द, वाघमोडेवाडी, पिंगळी खुर्द, किरकसाल येथील शेतकरी उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यातील अनेक पिढ्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. हा मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी तीस वर्षांपूर्वीच प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाहीत.
Wednesday, August 08, 2018 AT 08:35 PM (IST)
5चाफळ, दि. 5 : जनावरांना पाणी आणण्यासाठी व हातपाय धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या वृद्ध महिलेचा पाय घसरून विहिरीत  पडल्याने मृत्यू झाल्याची घटना चाफळ विभागातील सूर्याचीवाडी, ता. पाटण येथे शनिवारी दुपारी घडली. जनाबाई राजाराम सुर्वे (वय 70) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाफळ विभागातील सूर्याचीवाडी येथील जनाबाई सुर्वे या नेहमी-प्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या शेतात गेल्या होत्या. दुपारी त्या शेतातील आपले काम उरकून घरी येताना हातपाय धुण्यासाठी गावालगत असणार्‍या विहिरीवर गेल्या.  यावेळी त्यांचा पाय घसरून तोल जावून त्या विहिरीत पडल्या. पावसामुळे विहिरीत ज्यादा पाणी असल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी त्यांचा नातू राजेश हा पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला जनाबाई या विहिरीत पडल्या असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभय भोसले तपास करत आहेत. दरम्यान, चाफळ विभागातील सूर्याचीवाडी येथील गावातील वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे.
Monday, August 06, 2018 AT 09:13 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: